आदित्य ठाकरेंनी चहावाल्याला दिले १०० कोटींचे कंत्राट, सोमय्यांचा आरोप

आदित्य ठाकरेंनी चहावाल्याला दिले १०० कोटींचे कंत्राट, सोमय्यांचा आरोप

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सोमय्यांचा आरोप आहे की एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. ज्या कंपनीवर उद्धव ठाकरे यांनी बंदी घातली होती, त्याच कंपनीला आदित्य ठाकरे यांनी १०० कोटींचे कंत्राट दिले. सोमय्यांनी बुधवारी (१ मार्च) पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत.

सोमय्यांचा आरोप आहे, की १०० कोटींचा कोविड काळातील घोटाळा समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. कोट्यवधींच्या या अवैध देव-घेवमध्ये काहींना आयकर, काहींना ईडी तर काहींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीला महापालिकेकडून ३२ कोटी रुपये मिळाले होते. यातील १४ कोटी ३ लाख २९ हजार ८३९ रुपये हे एका वेगळ्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते.

एकाच्या मेहुण्याच्या खात्यात लाखो रुपये जमा
सोमय्या म्हणाले, या बँक खात्यातून कोणाकोणाला किती रुपये पाठवण्यात आले याची चौकशी सुरु आहे. इन्कम टॅक्स विभाग याची चौकशी करत आहे. एकाच्या मेहुण्याच्या खात्यात लाखो रुपये जमा करण्यात आले. ही व्यक्ती कोणाची नातेवाईक हे लवकरच समोर येईल. या प्रकरणात ज्याला अटक करण्यात आले आहे तो केईएम हॉस्पिटल बाहेर चहाविक्री करणारा आहे. याची माहिती मी मे २०२२ मध्येही घेतली होती.
एका चहावाल्याला १०० कोटींच्या कोविड सेंटरचे कंत्राट कसे काय देण्यात आले?
किरीट सोमय्यांनी आरोप केला की, एका चहावाल्याला १०० कोटींच्या कोविड सेंटरचे कंत्राट कसे काय देण्यात आले? आदित्य ठाकरे यांनी तर पुण्यातील पीएमआरडीए ने बंदी घातलेल्या कंपनीला वरळीत आयसीयू सुरु करण्याचे कंत्राट दिले. पीएमआरडीएचे अध्यक्ष तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या कोविड सेंटरमध्ये तेव्हा तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही कंपनी बंद करण्यात आली होती.
सोमय्यांनी आरोप केला की ज्या कंपनीला वडिलांनी बॅन केले आहे, त्याच कंपनीला मुलाने वरळीत कोविड आयसीयू सेंटरचे कंत्राट दिले होते. त्यासोबतच दहिसरच्या आयसीयूचेही कंत्राट त्याच कंपनीला देण्यात आले होते.

First Published on: March 1, 2023 10:58 PM
Exit mobile version