लेटरबॉम्बचे पडसाद दिल्लीत

लेटरबॉम्बचे पडसाद दिल्लीत

मृत्यूदंडाची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला तात्पुरती रजा देता येईल का? SC मध्ये याचिकेवर झाली सुनावणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बचे पडसाद सोमवारीही कायम होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पत्रात उल्लेख असलेल्या तारखांना अनिल देशमुख होम क्वारंटाईन असल्यामुळे पत्रातील दावा खोटा असल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव केला. तर दुसर्‍या बाजूला परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली. मुंबईत ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांची बैठक होऊन त्यात भाजपच्या आरोपांना बळी न पडता जशास तसे उत्तर देण्याची रणनीती ठरवण्यात आली. तर एटीएसने मनसुख हिरेन प्रकरणी वाझे यांची ठाणे, भिवंडी येथील कार्यालये आणि गोदामांवर छापे टाकत काही कागदपत्रे हस्तगत केली. या लेटरबॉम्बमुळे लोकसभाही हादरली असून भाजपच्या खासदारांनी लोकसभेत त्यावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली. मात्र, शिवसेनेच्या खासदारांचा प्रतिकार तोकडा पडल्याचे दिसून आले.

परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात याचिका 

डेलकरप्रकरणी भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी दबाव

राज्यातील गृहमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल लेटरबॉम्ब टाकून देशभर खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सोमवारी थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचारांची निपक्ष चौकशी करावी, पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाला केली आहे. तसेच आपले आरोप सिद्ध करण्याच्या हेतूने परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा आरोपांचा संदर्भही दिला आहे. तसेच दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात काही भाजपा नेत्यांना अडकवण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता, असा दावाही परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेमध्ये केला आहे.

रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालिन पोलीस महासंचालकांना दिली होती, असा दावा परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत केला आहे. रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचीही सीबीआय करावी. तसेच त्यांच्या अहवालात उल्लेख असलेल्या बदली आणि पोस्टिंगबद्दलच्या गैरप्रकाराची तपासणी करण्यात यावी, असे परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निपक्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सत्यता तपासणे आवश्यक आहे. अनिल देशमुखांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या निवासस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट अनिल देशमुखांनी दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.

राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालिन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी 24 अथवा 25 ऑगस्ट 2020 मध्ये पत्र लिहून पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावेळी या प्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आले होते. मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करून पोलीस अधिकार्‍यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

मला कोरोना झाल्याने नागपूरच्या अलेक्सिस रुग्णालयात मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीच्या दरम्यान तिथे होतो. १५ फेब्रुवारीला मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडत असताना अनेक पत्रकार उभे होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. त्यावेळेस मी नुकताच कोरोनातून बाहेर आलो होतो. माझ्या अंगात त्राण नव्हता. त्यामुळे मी रुग्णालयाच्या तिथेच गेटवर खुर्चीवर बसलो आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत मी गाडीत बसलो. त्यानंतर १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत होमक्वारंटाईन होतो. त्यानंतर २८ फेब्रुवारीला मी घराच्या बाहेर पडलो. सह्याद्री गेस्ट हाऊसला मी बैठकीला गेलो.
-अनिल देशमुख, गृहमंत्री.

First Published on: March 23, 2021 5:15 AM
Exit mobile version