उड्डाणपुलांच्या उद्घाटनानंतरही समस्या कायम 

उड्डाणपुलांच्या उद्घाटनानंतरही समस्या कायम 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांची कबुली

नवी मुंबई – एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-बेलापूर मार्गावर बांधण्यात आलेले घणसोली-तळवली आणि सविता केमिकल कंपनी येथील दोन उड्डाणपूल तसेच महापे येथील भुयारी मार्गाचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ऐरोली ते कल्याण येथील कटई नाका या उन्नत मार्गावर नवी मुंबईकडून ये-जा करण्यासाठी मार्गिकाच नसल्याचे फडणवीस यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी तात्काळ एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी जरी उड्डाण पुल खुले करण्यात आले असले तरी त्याचा योग्य वापर करता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऐरोली ते कटई नाका मार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गावर नवी मुंबईत चढण्या-उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्यात आलेली नाही. याचा फटका औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना होणार असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे या मार्गावर नवी मुंबईत मार्गिका बांधण्याची मागणी आमदार नाईक यांनी लावून धरली. ही मार्गिका बांधण्याची सूचना फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली आहे. यासंदर्भात लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

First Published on: May 22, 2018 7:21 AM
Exit mobile version