हल्ल्यानंतर ‘उरी’ला पुन्हा गर्दी

हल्ल्यानंतर ‘उरी’ला पुन्हा गर्दी

‘उरी’ चित्रपट

ये नया भारत है, जो घर में घुसेगा भी और मारेगा भी… उरी चित्रपटातील हा संवाद आज प्रत्येक भारतीयाला प्रत्यक्षात उतरलेला पहायचा आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्याची भावना देशवासियांमध्ये आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार मारण्याच्या भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी दी सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट पुन्हा लोकप्रिय होऊ लागला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण पुलवामा हल्ल्यानंतर पुन्हा उरी चित्रपटाच्या प्रेक्षक संख्येत मोठी वाढ झाली आहे.

गुरुवारी, १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वसामान्य लोकांनी आक्रोश व्यक्त केला. ‘पाकिस्तान का नामो निशान मिटा दो’ असे नारे लावून, तर कुठे पाकिस्तानचा झेंडा जाळून जनतेने आपला राग व्यक्त केला. देशातील अनेक बड्या राजकीय नेत्यांनी, बॉलिवूडच्या कलाकारांनी या हल्ल्याबाबत पाकिस्तानचा तीव्र निषेध केला. तर दुसरीकडे देशवासियांनी पाकिस्तानमध्ये शिरून गेलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरील चित्रपट ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाला गर्दी केली. याचा परिणाम म्हणजे गेल्या चार दिवसांत उरी चित्रपटाने ८कोटींच्यावर कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सातव्या आठवड्यात या चित्रपटाने तब्बल २३० कोटींचा पल्ला गाठला आहे.

केवळ पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे प्रदर्शनानंतर सातव्या आठवड्यातही उरीने ८ कोटी कमावले. चित्रपटात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर कशाप्रकारे हल्ला केला, त्याला भारताने सर्जिकल स्ट्राईक करून कसे चोख प्रत्युत्तर दिले हे दाखवले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर, दहशतवादी हल्ला नेमका कसा होतो हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आणि प्रेक्षकांनी उरी चित्रपटगृहात जाऊन बघितला. सध्या उरी देशभरात ८४० चित्रपटगृहात सुरू आहे. १५ फेब्रुवारीला शुक्रवारी १.२० कोटी, शनिवारी २.५१ कोटी, रविवारी ३.२१ कोटी आणि सोमवारी १.३२ कोटी अशी मोठी कमाई पुलवामा हल्ल्यानंतर ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने केली आहे.

१ कोटीची मदत
‘उरी’ चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याची घोषणा केली आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली. उरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाचे निर्माते पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची मदत करणार आहेत. त्याचबरोबर रॉनी स्क्रूवाला यांनी देशवासियांनी शहीद जवांनाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी.’असे अवाहन केले आहे.

First Published on: February 20, 2019 6:31 AM
Exit mobile version