‘या’मुळे आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

‘या’मुळे आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

'या'मुळे आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांनी जाहिर पाठिंबा दिल्यामुळे या संघटनेमध्ये फूट पडली आहे. आगरी सेना अंबरनाथ शहर प्रमुख सचिन पाटील, तालुका प्रमुख निलेश रसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या संघटनेचा राजीनामा दिला आहे. नुकतीच डोंबिवली येथे झालेल्या आगरी सेनेच्या सभेत आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. साळवी यांचा हा निर्णय अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पसंत पडला नव्हता, कारण आगरी समाजाचा मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण लोकसभा उमेदवार बाबाजी पाटील यांना पाठिंबा आहे. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करणे अपेक्षित असतांना साळवी यांनी मनमानी पद्धतीने हा निर्णय घेतला, असा आरोप आगरी सेनेचे अंबरनाथ शहराध्यक्ष सचिन पाटील यांनी आज २३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

मनमानी पध्दतीने घेतला निर्णय

सचिन पाटील पुढे म्हणाले की, आगरी सेना ही पक्ष विरहीत संघटना असून समाजहितासाठी काम करीत असते. शिवसेना-भाजपने आगरी समाजाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. मग ते नेवाळी आंदोलन असो, प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असो किंवा अन्य समस्या असो त्यामुळे युतीला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबा पाटील यांच्या पाठिशी आहोत, असे ते म्हणाले आहेत. याकारणामुळे सचिन पाटील यांच्यासोबत अंबरनाथ तालुका प्रमुख निलेश रसाळ, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी परिषदचे कुणाल पाटील, तालुका कार्याध्यक्ष महेश बळीराम जाधव, युवक उपाध्यक्ष स्वप्निल पाटील, तालुका उपाध्यक्ष जीवन पाटील यांच्यासह दीड हजार कार्यकर्त्यांनी आगरी सेनेचा राजीनामा दिला असल्याचे पत्रकार परिषदेत सचिन पाटील यांनी सांगितले.

First Published on: April 23, 2019 7:15 PM
Exit mobile version