AIFF – अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून सुरु. गीतकार जावेद अख्तर यांना जीवनगौरव पुरस्कार !

AIFF – अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून सुरु.  गीतकार जावेद अख्तर यांना जीवनगौरव पुरस्कार !



छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या ‘अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा’ (Ajanta Ellora International Film Festival) प्रारंभ आजपासून होत आहे. अनेक सिनेप्रेमी असे चित्रपट महोत्सव पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. छत्रपती संभाजी नगर येथे होणार असलेल्या या चित्रपट महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

यंदा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं नववं वर्ष आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजतागायत या महोत्सवाद्वारे करण्यात आलं आहे. या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज ३ जानेवारी २०२४ रोजी रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. ज्यात ख्यातनाम दिग्दर्शक आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महोत्सवाचं उदघाटन दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या हस्ते होणार असून, प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहे. भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल यंदाचा ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ जावेद अख्तर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

दि. ३ ते ७ जानेवारी या कालावधीत संपन्न होणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यात विशेष म्हणजे विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असणार आहे. हे चित्रपट राष्ट्रीय पातळीवरील पाच ज्युरी प्रेक्षकांसह पाहणार आहेत. या ज्युरींच्या निर्णयानुसार ज्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट जाहीर करण्यात येईल, त्याला ‘सुवर्ण कैलास’ पारितोषिक व एक लाख रूपये देण्यात येणार आहेत. सोबतच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ४ जानेवारीला दुपारी २ वा. आयनॉक्स येथे पा, चिनी कम, घुमर, शामीताभ, पॅडमॅन या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याच दिवशी ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक पद्मश्री जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई संवाद साधणार आहेत.

५ जानेवारीला आर्टिकल 15, थप्पड, रा-वन, मुल्क या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर ६ जानेवारीला प्रकाश मगदुम यांच्या गांधी आणि सिनेमा या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय सिनेमा गटातील सर्व दिग्दर्शकांसमवेत विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी चित्रपट रसिकांना या सिनेमांच्या दिग्दर्शकांसमवेत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधता येईल. ७ जानेवारीला ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक ध्रृतीमान चॅटर्जी यांच्या’ मृणाल सेन समजून घेताना’ या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. महान चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांमधून श्री. चॅटर्जी यांनी प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.

First Published on: January 3, 2024 3:12 PM
Exit mobile version