Crime News: मुंबईत एका एअर होस्टेसचा संशयास्पद मृत्यू

Crime News: मुंबईत एका एअर होस्टेसचा संशयास्पद मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईतील विले पार्ले इथे एका घरात २९ वर्षीय एअर होस्टेस महिला मृत आढळून आली आहे. मृत महिलेचे नाव सुलताना सलाउद्दीन शेख असून ती राजलक्ष्मी इमारत, विलेपार्ले (पूर्व) येथे राहत होती. हा मृत्यू बुधवारी झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी शेख यांना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल केले होते, पण तिथे डॉक्टरांनी शेख महिलेला मृत घोषित केले.

सदर महिला गो एअर कंपनीत कामाला असून ती तिच्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत राजलक्ष्मी इमारतीत इथे राहत होती. तिचे इतर दोन सहकारी लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी आपल्या मूळ गावी निघून गेले होते. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला असून त्यांना अद्याप सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

दुसऱ्या एका घटनेत कांदिवली पूर्व येथे अंकित सिंह नावाच्या २० वर्षीय युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या युवकाने राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

तर आज मुंबईत तिसऱ्या एका घटनेत कुलाबा येथे रामचंद्र भुनेश्वर (वय ४०) या व्यक्तिचा स्विमिंग पूर साफ करीत असताना शॉक लागून मृत्यू झाला. पूल साफ करत असताना इलेक्ट्रिक मोटर पाण्यात पडल्याने विजेचा स्पर्श पाण्याला झाला आणि भुनेश्वर पाण्यात असल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. बेशुध्द अवस्थेत असताना त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

First Published on: April 30, 2020 11:54 PM
Exit mobile version