…आणि विमान घसरले, पण दुर्घटना टळली

…आणि विमान घसरले, पण दुर्घटना टळली

एअर इंडिया एक्सप्रेसचा प्रातिनिधीक फोटो(सौजन्य- डेक्कन क्रोनिकल्स)

सध्या मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना एअर इंडियाचे एक्सप्रेस विमान आज धावपट्टीवरुन घसरले आणि एकच घबराट पसरली. मुंबई विमानतळावर ही घटना घडली. पण सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पण त्यामुळे धावपट्टी पावसात सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेमकं काय झालं ? 

एअर इंडियाचे एक्सप्रेस विमान IX213 हे विजयवाडा (महाराष्ट्र) ते मुंबई असे येत होते. मुंबईत पोहोचल्यावर मुख्य धावपट्टीऐवजी त्याला दुसऱ्या धावपट्टीवर उतरवण्यात आले. पण विमानाची चाके धावपट्टीवर आल्यानंतर ज्या ठिकाणी ते थांबणे अपेक्षित होते. तेथे न थांबता ते १० फूट पुढे जाऊन थांबले. हे विमान उतरल्यानंतर धावपट्टीवरुन घसरले,  विमान धावपट्टीवर घसरत असल्याचे लक्षात आल्यानंतर ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तरी देखील विमान थांबले नाही तर १० फूटापर्यंत घसरत गेले, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली.

प्रवासी सुरक्षित

विमान धावपट्टीवरुन घसरले असले तरी यात कोणालाही हानी पोहोचली नाही. विमानातून प्रवास करणारे प्रवासी सुरक्षित आहेत. दरम्यान,  विमानाला आणि विमानतळाचे देखील नुकसान झाले नाही, अशी माहिती देखील एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. शिवाय धावपट्टीवरुन विमान का घसरले याची चौकशी देखील होईल, अशी माहिती देखील एअर इंडियाकडून देण्यात आली आहे.

पुढील २४ तासही मुसळधार पाऊस

मुंबईत गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे तीन दिवस जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील २४ तासही असाच पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे गरज असल्यास घराबाहेर पडा, असे देखील सांगण्यात आले आहे.

First Published on: July 10, 2018 7:11 PM
Exit mobile version