ठाण्याची हवा बदलतेय..

ठाण्याची हवा बदलतेय..

स्वच्छ ठाणे, हरित ठाणे अशी घोषणा पालिकेकडून केली जात असतानाच ठाण्यातील हवा प्रदूषित असल्याची माहिती उजेडात आली आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी प्रदूषण अधिकच वाढले आहे. तीन हाता नाका परिसरात मेट्रोच्या कामांमुळे आणि वाढत्या वाहन संख्येमुळे ही हवा प्रदषित होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून ही माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे एकेकाळी असलेली ठाण्याची शुध्द हवा बदलत असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण विभागाच्या माध्यमातून दरवर्षी शहरातील हवेच्या गुणवत्तेचे निरिक्षण आणि मापन केले जाते. प्रदूषके हवेची गुणवत्ता कमी करून तिला प्रदूषित करत असतात. त्या प्रदूषकांमध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साइड, फोटो केमिकल, ऑक्सिडन्ट, धुळीकण, बेन्झिन तसेच शिसे, आर्सेनिक, निकेल यासारखे जड धातू इत्यादींचा समावेश असतो. पालिकेकडून निवासी व्यवसायिक आणि औद्योगिक अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणांच्या हवेची गुणवत्ता तपासून हवेतील प्रदूषकांचे मापन करण्यासाठी हवेचे निरिक्षण करण्यात आले आहे.
गतवर्षीपेक्षा हवा प्रदूषणाचा स्तर कोपरी व रेप्टाकोस येथे कमी झाला असून, व्यापारी क्षेत्रातील शाहू मार्केट येथे नागरिकरणात वाढ झाल्याने प्रदूषणाची पातळी उंचावली असल्याचे पर्यावरण अहवालात स्पष्ट झाले आहे. ठाण्याच्या तीन हात नाका येथे हवा गुणवत्ता उपकरण बसविण्यात आले आहे. तेथील हवा प्रदूषकांची 24 तास मोजणी केली जाते. गतवर्षी इथला (एपीआय )89 टक्के होता. तर यंदाच्या वर्षी 123 टक्के आहे. एपीआय गतवर्षीपेक्षा वाढल्याचे दिसून येत आहे. तीन हात नाका परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हवेची गुणवत्ता घसरली असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. वाढते नागरिकरण आणि वाहनांच्या संख्येमुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. त्यामुळे पालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग विविध उपक्रम राबवून प्रदूषण आटोक्यात आणणचा प्रयत्न करीत आहे.

चौकही धुळीच्या विळख्यातच

महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाकडून 16 चौकांच्या ठिकाणी हवेतील प्रदूषण मापन करण्यासाठी हवेचे निरीक्षण करण्यात आले. विविध चौकात पुलाचे बांधकाम फूटओवर पुलाचे बांधकाम मेट्रोचे काम मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम अशा विविध बांधकामामुळे धुळीच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. तर महापालिकेकडून सुरू असलेले रस्ता रूंदीकरण व काँक्रीटीकरण प्रकल्प, वृक्षलागवड यामुळे पोखरण रोड नं 1 वाघबीळ नाका गावदेवी नाका विटावा नाका विश्रामगृह कोर्टनाका या ठिकाणाच्या हवा प्रदूषण निर्देशांक गतवर्षीपेक्षा कमी झाला असून हवा प्रदूषण गुणवत्तेत चांगला बदल झाल्याचेही अहवालात स्पष्ट केले आहे.

तीन ठिकाणी निरीक्षण व मापन

निवासी क्षेत्र : कोपरी प्रभाग कार्यालय
व्यावसायिक क्षेत्र : शाहू मार्केट
औद्योगिक क्षेत्र : रेप्टाकोस, ब्रेट अ‍ॅण्ड कंपनी लि.

First Published on: December 18, 2019 5:41 AM
Exit mobile version