मुंबई, ठाण्यावर धुळीचे साम्राज्य

मुंबई, ठाण्यावर धुळीचे साम्राज्य

पाकिस्तानातून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे रविवारी महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याने उत्तर कोकण, मुंबई-ठाणे आणि पालघरमध्ये दिवसभर धुळीचे वारे वाहत होते. यामुळे हवेची गुणवत्ता चांगलीच खालावली होती. परिणामी नागरिकांना बोचर्‍या थंडीसोबतच धुळीचाही सामना करावा लागला. सोमवारी देखील काहीशा प्रमाणात असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानमधील धुळीचे वादळ राजस्थान, गुजरातमार्गे कोकण किनारपट्टीवर येऊन पोहोचल्याने त्याचा मुंबईसह ठाणे आणि पालघरच्या हवामानावर परिणाम झाला आहे.

धुळीच्या वार्‍यामुळे उत्तर कोकण, मुंबई-ठाणे आणि पालघरमध्ये दिवसभर कमी दृष्यमानता होती. रविवारी घराबाहेर पडलेल्यांना या खराब हवामानाचा फटका बसला. हवेतील धुलीकणांचे प्रमाण वाढल्यामुळे रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम दिसून आला. उंच इमारती, बस, लोकल ट्रेन अंधुक दिसून येत होत्या. मुंबईत रविवार सकाळपासूनच हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
दुसरीकडे कोकणातील अनेक भागांमध्ये रविवारी अवकाळी पावसाचे सावट दिसून आले. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. महाराष्ट्रासह पुण्यातल्या काही ठिकाणी २२ आणि २३ जानेवारीला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या अंदाजानुसार मध्यरात्री राज्यातल्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. राज्यातील नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगावमध्ये पावसाने हजेरी लावली.

 

First Published on: January 24, 2022 6:15 AM
Exit mobile version