विधानसभा अध्यक्षांनी सुनावली अजब शिक्षा..अजितदादांनी मागितली माफी!

विधानसभा अध्यक्षांनी सुनावली अजब शिक्षा..अजितदादांनी मागितली माफी!

महाराष्ट्र विधानसभा सभागृह

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. विद्यमान सरकारचं हे पहिलं-वहिलं पूर्णवेळ अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. मात्र, असं असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज प्रशासनावर कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढले. ‘सभागृहातल्या सदस्यांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या औचित्याच्या मुद्द्यांना प्रशासनाकडून उत्तर दिलं जात नाही. गेल्या अधिवेशनातल्या ८३ औचित्याच्या मुद्द्यांपैकी फक्त ४ मुद्द्यांनाच उत्तर दिलं गेलं आहे. त्यामुळे याबद्दल मुख्य सचिवांनी सभागृहाची माफी मागावी’, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी यावेळी दिले. मात्र, वेळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केल्यामुळे अध्यक्षांनी सुनावलेली शिक्षा मागे घेण्यात आली.

नक्की काय म्हणाले अध्यक्ष?

‘आपण अनेकदा प्रश्न उपस्थित करतो. सरकार आणि प्रशासन ते सोडवते. सदस्य औचित्याचे मुद्दे मांडतात. नागपूरच्या अधिवेशनात सदस्यांनी ८३ औचित्याचे मुद्दे नवीन आलेल्या सदस्यांनी उपस्थित केले. महिन्याभरात उत्तर मिळेल असं सांगितलं. पण ते अजूनही प्रलंबित आहेत. मी स्वत: याबाबत मुख्य सचिवांकडे पत्रव्यवहार करतो. पण त्याची दखल घेतली जात नाही. पण आता याचा सभागृहानं गांभीर्यानं निर्णय घ्यायची वेळ आलीये. ५.३० वाजता मुख्य सचिवांनी सभागृहाच्या गेटवर उभं राहून माफी मागावी आणि कधीपर्यंत या मुद्द्यांना उत्तर दिलं जाईल हे सभागृहाला सांगावं असे आदेश मी देत आहे’, असं विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाला आणि प्रशासनाला सुनावलं.

..आणि अजित पवारांनी मागितली माफी!

दरम्यान, अध्यक्षांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनीही सावध पवित्रा घेतला. अध्यक्षांनी संतापात शिक्षा सुनावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या आणि प्रशासनाच्या वतीने माफी मागितली. ‘या प्रकाराबद्दल मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो. यासंदर्भात सचिवांची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल आणि पुन्हा असं काही होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. मात्र, अध्यक्षांनी सुनावलेली ही गंभीर शिक्षा त्यांनी मागे घ्यावी अशी नम्र विनंती मी तुम्हाला करतो’, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

फडणवीसांचं अजित दादांना समर्थन!

उपमुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील समर्थन दिलं. ‘अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाच्या सदस्यांच्या अधिकारांबद्दल जागृकता दाखवली याबद्दल तुमचं अभिनंदन. पण आजपर्यंत अशा प्रकारची शिक्षा अध्यक्षांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेला माझं समर्थन आहे’, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी अध्यक्षांना केली.

अखेर अध्यक्षांनी शिक्षा मागे घेतली

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सभागृहातल्या अन्य काही सदस्यांनी केलेल्या विनंतीनंतर अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सुनावलेली शिक्षा मागे घेतली. मात्र, असं करताना ‘जर सत्ताधारी पक्षाने दिलेल्या आश्वसनानुसार कार्यवाही झाली नाही, तर मी माझे अधिकार वापरून कारवाई करेन’, असा दम देखील अध्यक्ष नाना पटोले यांनी भरला आणि या प्रकरणावर पडदा पडला.

पाहा नक्की घडलं काय याचा व्हिडिओ-

First Published on: March 2, 2020 1:03 PM
Exit mobile version