कृपा करून घराबाहेर पडू नका, घाबरून दुकानांत गर्दी करू नका – अजित पवार

कृपा करून घराबाहेर पडू नका, घाबरून दुकानांत गर्दी करू नका – अजित पवार

एकीकडे राज्यात मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केलेली असताना दुसरीकडे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दीचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: भाजीपाला, किराणासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळणं बंद होईल या भितीने किंवा त्यासंदर्भात उठणाऱ्या अफवांमुळे अशा बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामान्यांना आवाहन केलं आहे. ‘माझी हात जोडून विनंती आहे, कृपा करून घराबाहेर पडू नका, अफवांवर विश्वास ठेऊन गर्दी करू नका’, असं अजित पवार म्हणाल आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं आहे.

‘…तर भाजीपालाही बंद करावा लागेल!’

३१ मार्चपर्यंत राज्यभरात संचारबंदी लागू झाल्यामुळे आता भाजीपाला किंवा किराणा कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतो अशा प्रकारच्या अफवांमुळे किंवा भितीमुळे नागरिकांनी भाजी मार्केट आणि किराणाच्या दुकानांवर गर्दी केल्याचं ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘भाजीपाला, अन्नधान्य यांचा तुटवडा होणार नाही किंवा ते बंद देखील होणार नाही. त्यामुळे पुढच्या अनेक दिवसांचा भाजीपाला किंवा अन्नधान्य खरेदी करण्यासाठी गर्दी करू नका. जमावबंदी लागू करण्यात आली आहे, त्यासाठी सहकार्य करा. नागपूरमध्ये तर पोलीस अक्षरश: हात जोडून लोकांना विनंती करत आहेत की घराबाहेर पडू नका. त्यामुळे कृपा करून तुम्ही घराबाहेर पडू नका अशी माझी विनंती आहे. पण तरीदेखील लोकांनी ऐकलं नाही, गर्दी केली, तर भाजीपाला देखील बंद करण्याचा कठोर
निर्णय सरकारला घ्यावा लागेल’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

‘हा तर मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार’

दरम्यान, मुंबईत आज सकाळी तब्बल १५ कोटी किंमतीचे २५ लाख मास्क मुंबई पोलिसांनी धाड टाकून जप्त केले. या साठेबाजीवर अजित पवारांनी संताप व्यक्त केला. ‘साठेबाज म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद आहे. पैसा पुन्हा कमावता येईल. पण आत्ता ज्यांना गरज आहे, त्यांना मास्क पुरवा. तरीदेखील जर कुणी साठेबाजी करत असेल, तर त्याला असा कायदा लावला जाईल, की पुढच्या दोन पिढ्या त्याला लक्षात राहील की आपण चूक केली होती’, असं ते म्हणाले.


वाचा सविस्तर – CoronaVirus : मुंबईच्या वांद्रे परिसरातून १५ कोटींचे मास्क जप्त!
First Published on: March 24, 2020 10:22 AM
Exit mobile version