आमदार झिशान सिद्दीकी यांनी पत्रकार स्वप्निल जाधवला दिलेली धमकी निषेधार्ह – अजित पवार

आमदार झिशान सिद्दीकी यांनी पत्रकार स्वप्निल जाधवला दिलेली धमकी निषेधार्ह – अजित पवार

वांद्रे पूर्व काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांनी माय महानगरचे पत्रकार स्वप्निल जाधव (Journalist Swapnil Jadhav) यांना सोमवारी (ता. 05 जून) लाईव्ह रिपोर्टिंग सुरू असताना धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई क्राइम रिपोटर्स असोसिएशनसह (MCRA) मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने जाहीर निषेध केला आहे. तसेच शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तर आता या प्रकरणात महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांना अशा पद्धतीने धमकी देणे निषेधार्ह आहे, असे म्हणत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा – कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री अपयशी, नाना पटोलेंकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

माय महानगरचे पत्रकार स्वप्निल जाधव यांना धमकी देण्याच्या प्रकरणी बोलताना अजित पवार म्हणाले की, पत्रकारांच्या बाबतीमध्ये तारतम्य ठेवले पाहिजे हे अतिशय निषेधार्ह आहे. कुठल्याही पक्षाच्या व्यक्तींनी किंवा कोणत्याही राजकारण्यांनी पत्रकारांना धमकी देण्याचे कारण नाही. ते त्यांचे काम करत असतात. आपण त्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहतो. त्यामुळे धमकी देणं आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले.

तर याआधी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई हे या प्रकरणी बोलताना म्हणाले होते की, माध्यमांच्या कुठल्याही प्रतिनिधीला धक्काबुक्की किंवा दमदाटी झाली असेल. त्याचप्रमाणे दम देण्याचा प्रकार जर घडला असेल तर, तशी संबंधित तक्रार प्रतिनिधींनी पोलिसांना द्यावी. पोलीस सर्व प्रकारच्या बाबी तपासून घेतील. माध्यमांच्या व्यक्तींना दमदाटी करणारा कुणीही व्यक्ती असो, मग ती पदाधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा कुणीही असो त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करु, असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

निश्चितपणे कारवाई करू

शेवटी माध्यमांचे प्रतिनिधी हे वृत्त संकलन करण्यासाठी आणि ही माहिती सामान्य जनतेपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी म्हणून ते काम करत असतात. अनावधानानं घडलं असेल तर आम्ही समजू शकतो, पण जाणीवपूर्वक जर असं काही घडलं असेल आणि संबंधित प्रतिनिधींनी तक्रार केली असेल तर त्यावर चौकशी करून निश्चितपणे कारवाई करू, असं शंभुराज देसाई म्हणाले होते.

आमदार सिद्दिकी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
My Mahanagarचे पत्रकार स्वप्निल जाधव यांना काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी हात तोडण्याच्या दिलेल्या धमकीचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने तीव्र निषेध केला आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी वार्ताहर संघाने केली आहे. या मागणीसाठी संघाच्या वतीने आज, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. शिवाय, झिशान सिद्दीकी यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याची मागणी संघ प्रतिनिधी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन करणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो यांनी सांगितले.

तसेच टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने (महाराष्ट्र) देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. आमदार सिद्दीकी यांनी माफी मागवी अन्यथा पत्रकार संघटना आक्रमक भूमिका घेतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष विनोद जगदाळे आणि सचिव राजेश माळकर यांनी दिला आहे.

सिद्दीकी यांनी तत्काळ माफी मागावी

लोकप्रतिनिधी असूनही आमदार सिद्दीकी यांचे हे वागणे अशोभनीय असल्याचे सांगत, मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने पत्रकाराला धमकी देण्याच्या सिद्दीकी यांच्या कृतीचा जाहीर निषेध केला आहे. ‘आमदार झिशान सिद्दीकी यांनी या गोष्टीबद्दल माफो मागावी, अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (MIA) वतीने करत आहोत. पत्रकार स्वप्निल जाधव याच्यासोबत आम्ही आहोत,’ अशी स्पष्ट भूमिका एमएआय संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी घेतली आहे.

काय आहे प्रकरण ?

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी माय महानगरे पत्रकार स्वप्निल जाधव यांना काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेले आंदोलन कव्हर करताना धमकी दिली होती. आमदार प्रणिती शिंदे यांचे लाइव्ह करत असताना झिशान सिद्दीकी यांना लाईव्ह असल्याचे सांगत हात बाजूला केला होता. यावर मला हात कसा लावलास, पुन्हा हात लावला तर हात काढून हातात देईल अशी धमकी दिली. या प्रकाराचा सर्व पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.

First Published on: June 7, 2023 5:26 PM
Exit mobile version