मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहील – अजित पवार

मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहील – अजित पवार

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चा सुरू झालेली असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहील. कर्नाटकमधल्या नागरिकांना बरं वाटावं, म्हणून त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं आहे. त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्षच करायला हवं’, असं ते म्हणाले. तसेच, केंद्राचा अर्थसंकल्प लवकरच मांडला जाणार असून त्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष असणार असून कोणत्या वर्गासाठी काय जाहीर केलं जाईल, याविषयी लक्ष ठेऊन आहे, असं देखील अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

बेळगावविषयी अजित पवार म्हणाले…

बेळगाव आणि आसपासच्या मराठी गावांविषयी बोलताना अजित पवारांनी केंद्र सरकारवर देखील टिप्पणी केली. ‘ज्या गावांचा वाद आहे, तो मिटेपर्यंत तो भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत सुचवलं आहे. त्याचा मुंबईशी अर्थाअर्थी संबंध नाही. त्या भागात अनेक वर्ष आमदार, महापौर, नगरसेवक मराठी निवडून येत होते. तिथल्या बहुसंख्य लोकांची मागणी तशीच होती. नंतर तिथल्या मतदारसंघांची फेररचना केली. मराठी भाषिकांच्या गावांमध्ये इतर जास्त संख्येची कानडी गावं जोडली गेली आणि त्यातून मराठी आमदारांचे मतदारसंघ फोडले गेले. हा त्यांचाच भाग असल्याचं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन राज्यांबाबतच्या अशा वादामध्ये केंद्राने मध्यस्थी करून मार्ग काढायचा असतो’, असं ते म्हणाले.

‘बेळगाव हे कर्नाटकचं विभाज्य अंग आहे. महाराष्ट्रातल्या नेतेमंडळींनी कितीही ओरड केली, तरी चंद्र-सूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकमध्येच राहणार. बेळगाव सोडा, मुंबई देखील कर्नाटकचाच भाग आहे’, असं विधान सीमावादावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं.

अर्थसंकल्पावर आम्ही लक्ष ठेऊन…

केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पावर देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘देशाचे बरेच महिने लॉकडाऊनमध्ये गेले. आमचंही लक्ष आहे की अर्थसंकल्पात कुणाला प्राधान्य मिळतंय. वंचित, गरीब, दुर्लक्षित वर्गाला न्याय देण्याची भूमिका आहे किंवा नाही. मध्यम वर्गाला दिलासा देण्याचं काम करतात की नाही. केंद्राच्या अर्थसंकल्पाचा आधार राज्य सरकारं त्यांच्या अर्थसंकल्पात घेत असतात’, असं ते म्हणाले.

First Published on: January 28, 2021 12:23 PM
Exit mobile version