भिवंडीत गावठी दारूचा साडेपाच लाखांचा माल जप्त

भिवंडीत गावठी दारूचा साडेपाच लाखांचा माल जप्त

भिवंडीत गावठी दारूचा साडेपाच लाखांचा माल जप्त

ठाणे ग्रामीण पोलिसांनी खार्डी गावच्या दक्षिणेकडील खाडीलगत छापा टाकून अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून या काळात ठाणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी दारू तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने अपर पोलिस अधिक्षक संजयकुमार पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक व्यंकट आंधळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार भिवंडी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोमवार, २२ एप्रिल रोजी खार्डी गावचे दक्षिणेकडील खाडीलगत छापा टाकला आहे. त्यांनी घातलेल्या छाप्यामध्ये प्रविण तांगडी आणि मनोज बसवंत (दोन्ही राहणार खार्डी) यांना रंगेहाथ पकडले आहे.

गावठी दारुसाठा केला हस्तगत

छापे घातलेल्या ठिकाणी ६७ प्लॅस्टीक ड्रममध्ये एकूण १३,४०० लिटर गावठी हातभट्टीत तयार करण्यात आलेली गूळमिश्रीत नवसागर वॉशचा साठा आणि दारू तयार करण्याची साधने असा एकूण ५ लाख ५१ हजार ४०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. याबाबत भिवंडी तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे छापे स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीणचे वासिंग युनिटकडील सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश पाटील, धनंजय पोरे, उपनिरिक्षक जी. एस. सुळे आणि सहकारी ठाकरे, गायकर, कोळी, डोंगरे, राय तसेच भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सांगडे, सहकारी पाटील, लाडकर यांनी ही कामगिरी पार पाडली, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

First Published on: April 23, 2019 9:30 PM
Exit mobile version