सोमवारपासून मुंबई महापालिकेत आता कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती! प्रशासनाचे आदेश!

सोमवारपासून मुंबई महापालिकेत आता कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती! प्रशासनाचे आदेश!

राज्य शासनाने जिथे आपल्या कर्मचाऱ्यांना १० टक्के उपस्थित राहण्याची सूट दिलेली असतानाच मुंबई महापालिका प्रशासनाने महापालिका कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. ३० मार्च २०२० रोजी महापालिकेच्या कामगार, कर्मचारी यांना कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांपैकी ५० टक्के उपस्थित राहण्याबाबतचे आदेश रद्द करून १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे परिपत्रक ३० एप्रिल २०२० रोजी जारी केले आहे. त्याची अंमलबजावणी त्वरीत लागू करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, एका बाजुला वाहनांची सुविधा नसताना सर्वच कर्मचाऱ्यांना कामावर बोलावल्यामुळे या परिपत्रकांमुळे एकप्रकारे खेळखंडोबाच होणार असल्याचे दिसून येत आहे.

आयुक्तांच्या स्वाक्षरीने सामान्य प्रशासनाने जारी केलेल्या या परिपत्रकांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता जे कामगार, कर्मचारी पनवेल, बदलापूर, आसनगाव, वसई इत्यादी किंवा पुढे राहत असतील त्यांनी महापालिकेच्या हद्दीतील निकटच्या विभाग कार्यालयांमध्ये सेवा द्यावी, असे निर्देश दिले आहे. त्यामुळे विभाग कार्यालयांनी अतिरिक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांची सेवा कोविड संदर्भातील उपाययोजनासंबंधी वापरावी आणि दर महिन्याला त्याचा हजेरीचा अहवाल कर्मचाऱ्यांच्या मूळ खात्यात अथवा विभागाला कळवावे, असेही या परिपत्रकांत म्हटले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला आवश्यकता भासल्यास कर्मचाऱ्यांस कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असेल तसेच प्रशासनाने कळवल्यानंतरही जे कर्मचारी व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार नाही.  विना परवानगी ते अनुपस्थित राहतील त्यांना स्मरणपत्रे पाठवावी. त्यानंतरही ते कर्तव्यावर येत नसतील तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश आयुक्तांनी या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. मात्र खातेप्रमुख किंवा विभागाने उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्यास त्यानुसार कार्यालयांमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक असेल असेही यात नमुद केले आहे.

५५ वर्षावरील मधुमेही, उच्च रक्तदाब डायलिसिस कर्मचाऱ्यांना सुट्टी

मुंबई महापालिकेच्या ५५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना जर मधुमेह, उच्च रक्तदाब, डायलिसिस अशा स्वरुपाचे आजार असल्यास त्यांना पुढील एक महिना सुट्टी राहणार आहे. त्यांना पुढील एक महिना कर्तव्यावर उपस्थित राहण्यास प्रशासनाने सूट दिलेली आहे. मात्र, कोणतेही आजार नसलेल्या ५५ वर्षे किंवा त्यापुढील कर्मचारी तथा अधिकाऱ्यांना तसेच डॉक्टर्स यांना कोविड रुग्ण असलेल्या ठिकाणी नेमणूक न करण्याचेही निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

कोविड रुग्ण परिसरात सेवा नाही

वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली नियुक्ती ही लिपिक तथा कनिष्ठ अभियंता वा दुय्यम अभियंता या स्तरावरुन होते. त्यामुळे ५५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या एकूण वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी साधारणपणे ६० टक्के वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा महापालिकेला उपलब्ध होवू  शकणार नाही. त्यामुळे ५५ वर्षे वा त्यापुढील वय असणाऱ्या सहायक अभियंता व त्यापुढील अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी वर्ग या दर्जाचे अधिकारी व डॉक्टर्स यांना आजार असल्यास त्यांची नेमणूक कोविड रुग्ण असलेल्या ठिकाणी करू नये, असेही नमूद केले.

First Published on: April 30, 2020 11:39 PM
Exit mobile version