कमला मिलमधील सर्व हॉटेल्सची होणार तपासणी

कमला मिलमधील सर्व हॉटेल्सची होणार तपासणी

कमला मिलमधील सर्व हॉटेल्सची होणार तपासणी

लोअर परळ येथील कमला मिलमधील वन अबव्ह रेस्टॉरंटला लागलेल्या आगीच्या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, दोन वर्षांनंतरही तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन केले जात नसून पुन्हा एकदा कमला मिलमध्ये अनेक हॉटेल्स सुरु झाल्या आहेत. परंतु त्यांच्याकडे आग प्रतिबंधक उपाययोजनांची पूर्तता करणारे प्रमाणपत्र नसतानाही त्यांना आरोग्य खात्याने परवानगी दिल्यामुळे पुन्हा अशी हॉटेल्स सुरु झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी येथील सर्व हॉटेल्सची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली.

विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर अध्यक्षांनी दिले निर्देश

स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आगीच्या दुघर्टनांची माहिती देणार्‍या प्रस्तावावर म्हणाले की, कुठल्याही प्रकारे आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रमाणपत्र नसताना आरेाग्य विभागाच्यावतीने प्रमाणपत्र हॉटेल्सना दिले जात आहेत. गेट वे ऑफ इंडियाजवळील गार्डन हाऊसमधील अनियमिततेवर लक्ष वेधत त्या हॉटेलची तपासणी करण्याची मागणी राजा यांनी यावेळी केली. या हॉटेलला ‘ओसी’ नसताना त्यांना आरोग्य खात्याने तसेच आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबतची पूर्तता नसताना परवानगी दिली कशी? असाही सवाल त्यांनी केला.

‘कमला मिल कंपाऊंड परिसरात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर काही महिने सर्व हॉटेल्सची तपासणी केली गेली. परंतु पुन्हा एकदा आगीच्या घटनांकडे दुर्लक्ष करत अशा हॉटेल्सना परवानगी दिली जात आहे. त्यामुळे कमला मिल कंपाऊंडमध्ये अशाप्रकारे हॉटेल्स सुरु झालेली असून त्याची चौकशी केली जावी. या परिसरातील सर्व हॉटेल्सची पुन्हा तपासणी केली जावी’, अशीही मागणी त्यांनी केली. अग्निशमन दल पुन्हा आगीची दुघर्टना होण्याची वाट पाहते काय? असा सवाल केला. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी गॉर्डन हाऊसबाबत दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा विस्तृत अहवाल स्थायी समितीला सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच त्यांनी केलेल्या मागणीनुसार संबंधित भागातील हॉटेल्सची तपासणी करून त्यात जर चुकीचे आढळून आल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी, असेही निर्देश दिले.

First Published on: December 19, 2019 10:53 PM
Exit mobile version