भाजप सोडणार्‍यांना महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष निवडून आणतील – अजित पवार

भाजप सोडणार्‍यांना महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष निवडून आणतील – अजित पवार

भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतील त्यांच्या विरोधात भाजपने कितीही ताकद लावली तरी त्यांना महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. माजी आमदार राजीव आवळे यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्यानंतर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे ही यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार्‍यांची संख्या वाढली आहे.

भाजपकडून पदाधिकार्‍यांना प्रलोभने आणि दडपण आणून पक्षातून फोडण्याचा प्रयत्न झाला. आता सत्ता गेल्यापासून हे कार्यकर्ते विचलित झाले आहेत. भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू, असे सांगतानाच येत्या काळात अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असेही अजित पवार म्हणाले.

First Published on: December 17, 2020 7:06 AM
Exit mobile version