ठाणे आरटीओतील अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी परवानगी द्या

ठाणे आरटीओतील अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी परवानगी द्या

आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी विकास पांडकर, जितेंद्र पाटील, हेमांगिनी पाटील आणि संजय डोळे यांची प्राप्त तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास चौकशी करावयाची आहे. त्यासाठी परिवहन विभागाची परवानगी मिळावी, यासाठी ठाणे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी राज्य परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्याकडे एका लेखी पत्रान्वये मागणी केली आहे. त्यामुळे परिवहन विभागात खळबळ माजली आहे.

ठाणे आरटीओ भागात दलालांचा नेहमीच गराडा पडलेला असतो. येथील परिवहन कामकाजासाठी सामान्य नागरिकांकडून अधिकारी चिरीमिरी घेतल्याशिवाय कामेच करीत नाहीत. तसेच कार्यालयात खासगी व्यक्तींच्या सेवा वापरू नयेत, असे सरकारचे आणि लोक आयुक्त यांचे आदेश असताना देखील ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात सर्रासपणे खासगी व्यक्तींच्या सेवांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे.

याबाबत राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष शरद धुमाळ यांनी या सर्व अधिकार्‍यांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाची शासनाने गंभीर दखल घेऊन ठाणे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना लेखी पत्र पाठवून ठाणे आरटीओ कार्यालयाकडे कार्यरत असणार्‍या तत्कालीन परिवहन अधिकारी विकास पांडकर ,जितेंद्र पाटील, संजय डोळे व हेमांगिनी पाटील यांच्याबाबत चौकशी आणि पुढील कार्यवाही करण्यासाठी मान्यता मिळवी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी राज्य परिवहन आयुक्त शेखर चन्ने काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

First Published on: October 11, 2019 1:42 AM
Exit mobile version