अंबाडी – वज्रेश्वरी रोडवर अपघात; ४ दुचाकीस्वार जखमी

अंबाडी – वज्रेश्वरी रोडवर अपघात; ४ दुचाकीस्वार जखमी

भिवंडीहून वज्रेश्वरी येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना कार आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगातील कारची समोरून धडक लागून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातात चार दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात झिडके गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडला आहे. दिपककुमार रामनेवल वर्मा (२४), धर्मपाल शिवबकस चव्हाण (२३), जोगेंद्र सुभेदार राम (२२) आणि आकाश सुरेश रावत (२४) हे तरुण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

भिवंडी येथील न्यू आझादनगर येथे राहणारे तरुण देवदर्शनासाठी भिवंडीहून वज्रेश्वरी येथे जात होते. हे चौघेही दिपककुमार या मित्राच्या दुचाकीवरून वज्रेश्वरी येथे देवदर्शनासाठी निघाले होते. ते झिडके हद्दीत असताना समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून कार आल्याने त्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीसह चौघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात या चौघांचेही उजवे पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या चार ही तरुणांना उपचारासाठी अंबाडी येथील गुरुदत्त हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी या चौघांना भिवंडीत खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघाती प्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अपघातानंतर फरार झालेल्या कार चालकाचा पोलीस हवालदार शंकर जानकर कसून शोध घेत आहेत.

First Published on: July 12, 2019 10:14 AM
Exit mobile version