कल्याणमध्ये अमेरिकेतून आलेल्या कुटुंबातील १६ वर्षीय मुलाची आत्महत्या

कल्याणमध्ये अमेरिकेतून आलेल्या कुटुंबातील १६ वर्षीय मुलाची आत्महत्या

अमेरिकेतून आलेल्या कुटुंबातील १६ वर्षाच्या मुलाने इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी कल्याणच्या खडकपाडा परिसरात घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.

प्रथमेश गोळे असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. प्रथमेश आणि त्याचे सर्व कुटुंब मागील अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झाले होते. इयत्ता १०वी पर्यंत अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या प्रथमेश आणि त्याचे कुटुंब ४ महिन्यांपूर्वीच भारतात आले होते. कल्याणच्या खडकपाडा येथील सिझन स्प्रिंग या उच्चभ्रू इमारतीच्या १७ व्या मजल्यावर गोळे कुटुंब राहण्यास होते. कल्याण मध्येच पुढील शिक्षण घेण्याच्या तयारीत प्रथमेश होता. दरम्यान बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खिडकीतून काही तरी पडण्याच्या आवाज गोळे कुटुंबाला आला, त्यांनी खाली वाकून बघितले असता प्रथमेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

गोळे कुटुंबीयांनी ताबडतोब प्रथमेशला नजीकच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी खडकपाडा पोलीसानी अपघाती मृत्यूची नोंद केली असून प्रथमेशने आत्महत्या का केली याबाबत तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.

First Published on: October 29, 2020 8:08 PM
Exit mobile version