कॅन्सर पीडितासाठी रेल्वे अधिकारी बनला देवदूत

कॅन्सर पीडितासाठी रेल्वे अधिकारी बनला देवदूत

मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. घडाळ्याच्या काटावर मुंबईकरांचे जनजीवन सुरू असते, अशा वेळी कोणत्या प्रवाशाचा अपघात झाला अथवा त्याला साधी चक्कर आली, तरी कुणी तत्काळ त्याच्या मदतीला धावून येईलच, असे ठामपणे सांगता येत नाही, पण एका कॅन्सर पीडिताला वेगळाच अनुभव आला. रेल्वे स्थानकात चक्कर येऊन पडलेल्या एका कॅन्सर पीडिताच्या मदतीसाठी चक्क रेल्वे अधिकारी धावून आला, त्याने तत्काळ त्याला हॉस्पिटलात दाखल केले. उपचाराचा खर्च दिला, तसेच वेळोवेळी मानसिक आधारही देऊन त्याची तब्येत पूर्णपणे बरी होईपर्यंत पाठपुरावाही केला.

सुभाष खैरे असे या कॅन्सर पीडिताचे नाव आहे. त्याला आलेला सुखद अनुभव दैनिक ‘आपलं महानगर’सोबत कथन करताना खैरे यांचे डोळे पाणावले. 2015सालापासून खैरे हे पोटाच्या कॅन्सरने त्रस्त होते. साकीनाकाच्या शिवनेरी विद्या मंदिर शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. दीर्घकालीन आजारामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सुभाष यांच्यावर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पत्नी वैशाली खैरे ह्या सुभाषला नेहमी लोकलमधून उपचारासाठी घेऊन जात. एक दिवस कामा हॉस्पिटलमध्ये मेडीकल बिलाच्या कामानिमित्त ते दोघे निघाले होते. कामा हॉस्पिटलमध्ये बराच वेळ लागला, त्यावेळी सुभाष यांना अस्वस्थ वाटू लागले. सुभाष यांची पत्नी त्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथे पोहचली. तेव्हा टिटवाळाच्या जलद लोकलमध्ये ते दोघे बसले. त्यानंतर मात्र सुभाष यांना चक्कर आली. त्यामुळे वैशाली ह्या तातडीने सुभाष यांना घेऊन खाली उतरल्या. प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी होती. तिथे सुभाष पत्नीच्या मांडीवर बराच वेळ पडून होते. त्यांच्याकडे पैसे नव्हते, तसेच ओळखीचे कुणीही दिसत नव्हते. त्यावेळी सुभाषची परिस्थिती बघून पत्नी रेल्वे स्थानकावर मदतीसाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचे अधिकारी ए.के. सिंह त्या ठिकाणी येत होते. त्यांना पाहून ‘साहेब’, अशी आर्त किकांळी सुभाष यांची पत्नी वैशाली यांनी मारली. हे ऐकताच रेल्वेचे अधिकारी ए.के. सिंह त्यांना बघून तिथे धावून आले. थोडाही वेळ न दवडता सिंह यांनी रेल्वे स्थानकावर व्हील चेअर मागवली, तसेच फोर्टमधील एका हॉस्पिटलमध्ये सुभाष यांना दाखल केले, त्याचबरोबर पत्नी वैशाली यांना पैसेही दिले.

कॅन्सर झाल्याने सुभाष यांनी नोकरी सोडली होती. सुभाषला मिळणारे वेतन येणेसुद्धा बंद झाले होते. उलट घरात एकटाच कर्ता पुरुष असल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर आभाळ कोसळले होते. कॅन्सर आजाराच्या उपचारासाठी सुभाषकडील जमापूंजी पूर्णपणे संपली होती. सुभाष यांच्या या आर्थिक परिस्थितीविषयी वैशाली यांच्याकडून सविस्तर माहिती मिळाल्यावर सुभाषच्या उपचारासाठी ए.के. सिंह यांनी आर्थिक मदत केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रकृतीची नेहमी विचारपूस केली.

आयुष्यभर मदत विसरणार नाही

सुभाष खैरे यांना रेल्वे अधिकारी ए.के. सिंह यांच्या सतर्कतेमुळे आणि आर्थिक, मानसिक मदतीमुळे नवजीवन मिळाले. जेव्हा सुभाष कॅन्सरने त्रस्त होता तेव्हा अनेकदा त्यांच्या डोक्यात वाईट विचार फिरत होते. मात्र सिंह यांच्यासारख्यामुळे त्यांना मानसिक आधार दिला. सोबत कॅन्सरच्या विरोधात लढण्याची शक्तीसुद्धा सिंह यांच्यासारख्या अधिकार्‍यांकडून मिळाली. त्यांच्या या मदतीमुळे आज सुभाष खैरे यांना नवजीवन मिळाले. त्यांची मदत आयुष्यभर विसरू शकणार नाही.
– सुभाष खैरे, कॅन्सर पीडित रुग्ण .

सुभाष खैरे यांची आर्थिकस्थिती नाजूक आहे. त्यांनी नोकरी सोडली आहे. अशा वेळी त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. मीच नव्हे तर माझ्यासारख्या अनेकांनी मदत केली असती. आज पूर्णपणे सुभाष खैरे बरे झाले आहेत. त्याचा मला खूप आनंद आहे. त्यासाठी प्रसिद्धी मिळावी, अशी कोणतीही इच्छा नाही.
– ए.के. सिंह, रेल्वे अधिकारी

First Published on: November 26, 2018 5:33 AM
Exit mobile version