२५ कोटींचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

२५ कोटींचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

प्रातिनिधिक फोटो

सुमारे २५ कोटी रुपयांच्या अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. प्लॉट विकसित करण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

घराच्या व्यवहारात फसवणूक

निरज जयंतीलाल व्होरा हे कांदिवलीतील एस. व्ही. रोडवरील बालभारती शाळेसमोरील महालक्ष्मी सेंटर अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक एफ/१ मध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. यातील आरोपी बांधकाम व्यावसायिक असून त्यांची आठ वर्षांपूर्वी निरज व्होरा यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीत आरोपीने त्यांना मिरारोड येथील मिरागावात त्याच्या मालकीचा एक मोठा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये गुंतवणूक करुन प्लॉट विकसित करु तसेच त्यातून येणारा फायदा ५०/५० वाटून घेऊ असे आमिष दाखविले होते. त्याचा हा प्रस्ताव आवडल्याने त्यांनी २०१० आणि २०११ या दोन वर्षांत टप्याटप्याने आरोपीच्या बँक खात्यात धनादेश तसेच कॅश स्वरुपाात सुमारे २५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र आरोपींनी ही रक्कम प्रकल्पामध्ये न वापरता स्वतच्या फायद्यासाठी त्याचा वापर केला होता.

कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने ही रक्कम न देता त्याची फसवणूक केली होती. त्यामुळे त्यांनी कांदिवली पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित मुख्य आरोपीसह इतरांविरुद्ध पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

First Published on: November 24, 2018 8:01 PM
Exit mobile version