विरारमध्ये अनधिकृत इमारतीचा भाग कोसळला; ४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

विरारमध्ये अनधिकृत इमारतीचा भाग कोसळला; ४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

विरार पूर्वेकडील कोपरी परिसरात चार मजली अनधिकृत इमारतीचा भाग कोसळून एका ४ वर्षाच्या मुलीचा नाहक बळी गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान वसई-विरार महानगरपालिकेने त्यांच्या हद्दितील अनेक इमारती धोकादायक जाहीर केल्या होत्या. काल घडलेल्या घटनेतील इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत आहे का? हे अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी येथील नागरिक करत आहेत.

विरार पूर्व कोपरी गावातील नित्यानंद नगर परिसरात अनेक बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. पैकी एक ५ ते ६ वर्षं जुन्या नित्यानंद धाम या ४ मजली इमारतीच्या टेरेसचा भाग कोसळला. मंगळवारी रात्री ८ वाजता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जा खाली कोसळला. या घटनेत ४ वर्षीय भूमी पाटील हिचा मृत्यू झाला. भूमीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेवेळी इमारतीतील १० कुटुंबं इमारतीच्या ४थ्या मजल्यावर अडकली होती. इमारतीचा काही भाग कोसळल्याने या रहिवाशांना मार्गात अडथळा येत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. अजून कोणी इमारतीत अडकले का? याचा शोध अद्याप सुरु आहे.

First Published on: October 16, 2019 10:05 AM
Exit mobile version