अखेर ‘त्या’ आरटीओ अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश

अखेर ‘त्या’ आरटीओ अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश

राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्काची हानी करणारे पुणे येथील तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी व सद्या परिवहन आयुक्त कार्यालय बांद्रा, मुंबई येथे उपायुक्त (प्रशासन) या पदावर कार्यरत असणारे जितेंद्र बाबुराव पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य मुद्रांक महानिरिक्षक डॉ. रामास्वामी एन. यांनी पुणे विभागाच्या मुद्रांक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, शासनाने पुणे येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून जितेंद्र पाटील यांची नियुक्ती केली होती. त्या दरम्यान शासनाच्या परिवहन विभागामार्फत २०१६ मध्ये रस्ते सुरक्षा अभियान राबविण्याकरता पुणे विभागीय परिवहन कार्यालयासाठी मोठी आर्थिक तरतुद करण्यात आली होती. मात्र रस्ता सुरक्षा अभियान राबवताना विहीत पध्दतीचा अवलंब करून कार्यवाही करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले होते. परंतू पुणे येथे कार्यरत असणारे तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियान राबवताना शासनाचे आदेश धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने रस्ता सुरक्षा अभियानाबाबत कार्यवाही केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष शरद धुमाळ यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती प्राप्त केली असता पुणे येथील तत्कालीन परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियानाची पुणे परिक्षेत्रात अंमलबजावणी करतांना मर्जीतील ठेकेदार मे. आर्टस्कोप क्रिएशन व इतर पुरवठादारांना ३ लाख रूपयांची कामे वितरित केली आहेत.

विशेष म्हणजे या ठेकेदारांना वर्क ऑर्डर देताना त्यांच्याशी विहीत रकमेच्या मुद्रांक शुल्काचे स्टॅम्प पेपरवर करारानामे देखील केलेले नाहीत. त्यामुळे राज्य शासनाच्या महसुलाची फार मोठी हानी जितेंद्र पाटील यांनी केली आहे. याविरोधात शरद धुमाळ यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन देवून जितेंद्र पाटील यांनी महसुल हानी केल्यामुळे त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. धुमाळ यांनी सादर केलेल्या तक्रारी निवेदनाची गंभीर दखल घेवुन महसुल हानी केल्याप्रकरणी तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे नोंदणी महानिरिक्षक डॉ. रामास्वामी एन. यांनी दिल्याने सहनोंदणी महानिरीक्षक तसेच मुद्रांक अधिकारी नयना बोरांडे यांनी चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले आहेत. या कारवाईने राज्याच्या परिवहन विभागात प्रचंड खळबळ माजली आहे.

First Published on: September 15, 2019 5:10 PM
Exit mobile version