अंधेरी रेल्वे स्थानकातील पादचारी पूल ९० दिवस बंद

अंधेरी रेल्वे स्थानकातील पादचारी पूल ९० दिवस बंद

अंधेरी पूल (सौजन्य - हिंदूस्तान टाईम्स)

अंधेरी येथे पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने मुंबईतील धोकादायक पुलांचे ऑडिट केले. त्यातील काही धोकादायक पूल बंद करण्यात आले. त्यानुसार, अंधेरी स्टेशन जवळील मुंबई महापालिकेचा पादचारी पूल धोकादायक असल्यामुळे डागडुजीसाठी ९० दिवस म्हणजेच पुढचे ३ महिने पादचाऱ्यासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. येत्या ६ ऑगस्टपासून हा पादचारी पूल बंद करण्यात येणार असून ३ नोव्हेंबरला हा पूल पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तोवर नागरिकांनी उत्तरेकडील पादचारी पुलाचा वापर करावा असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले प्रवाशांसह पादचाऱ्यांना केले आहे.

बदलापूरचा पूलदेखील १ महिना बंद

अंधेरी पुलासह मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक १, २ आणि ३ ला जोडणारा रेल्वेस्थानकाच्या मधला पादचारी पूल बंद करण्यात येणार आहे. हा पूल ९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत बंद करण्यात येणार आहे. यादरम्यान पादचाऱ्यांनी रेल्वे स्थानकातील इतर पादचारी पुलांचा वापर करण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे.

उशीरा आलेली जाग

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील रेल्वे हद्दीतील ४४५ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रेल्वे आणि महापालिकेने संयुक्तपणे पुलांची पाहणी सुरु केली आहे. या पाहणीत लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक स्थितीत आढळून आल्याने तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर इतर जुन्या पुलांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे केले ऑडीट

अंधेरीसारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे आणि मुंबई पालिका प्रशासनाने पावले उचलली. मुंबई आयआयटीमधील तज्ज्ञांच्या सहकार्याने मुंबई आणि उपनगरात रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या सर्व बांधकामांची पाहणी व तपासणी करण्यात आली. सर्व पुलांच्या बांधकामांच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’साठी १० पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये पालिका, रेल्वे व आयआयटी तज्ज्ञांचा समावेश होता.

 

 

 

First Published on: August 4, 2018 5:23 PM
Exit mobile version