अंधेरी पूल दुर्घटना – ३ जखमींची प्रकृती गंभीर

अंधेरी पूल दुर्घटना – ३ जखमींची प्रकृती गंभीर

अंधेरी गोखले पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या ५ जणांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या तिघांवरही दुर्घटनेनंतर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पण, अजूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे. अंधेरी गोखले पूल दुर्घटनेत एकूण पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी चौघांवर विलेपार्लेच्या कूपर रुग्णालयात आणि एकावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळेत मुलाला सोडून परतत असणाऱ्या अस्मिता काटकर पूलासोबत अंधेरी रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवर कोसळल्या. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालय प्रशासन आणि कुटुंबियांनी सांगितलं आहे. तर, गिरीधारी सिंग यांचीही प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्राथमिक उपचारानंतर मनोज मेहता हे नानावटी रुग्णालयात शिफ्ट झाले आहेत. त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. तर, इतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. द्वारकाप्रसाद शर्मा यांच्यावर ही बुधावरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

लहू काटकर

” डॉक्टरांनी आम्हांला तिचं ऑपरेशन केलं आहे असं सांगितलं आहे. पण, अजूनही ती शुद्धीवर आली नाही. आमचा मुलगा खूप लहान आहे म्हणून खूप काळजी वाटते. ती लवकर बरी व्हावं असं वाटतं.” – लहू काटकर, अस्मिताचे पती

याविषयी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, काटकर यांची प्रकृती शस्त्रक्रियेनंतरही गंभीर आहे. सिंग यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

First Published on: July 4, 2018 10:11 PM
Exit mobile version