प्राण्यांच्या रक्षणासाठी मुंबईतील प्राणीमित्र केरळात

प्राण्यांच्या रक्षणासाठी मुंबईतील प्राणीमित्र केरळात

केरळमधील महापुराचे पाणी ओसरत असताना आता वन्यप्राणी आणि नागरिकांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. पूर ओसरल्याने नागरिक आता घराकडे परतू लागले आहेत. पुरासोबत वाहून आलेले साप आणि इतर वन्यप्राणी घरात आणि गावात आश्रयाला आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्था वन्यप्राणी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी केरळला रवाना झाल्या आहेत.

कोणत्याही परिसरातील पूरस्थिती ओसरल्यानंतर तेथील गावांमध्ये, घरांमध्ये साप, विंचू हे विषारी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आश्रयाला येतात. पूर ओसरल्याने नागरिक घराकडे परतत असतात. परंतु घरामध्ये व गावामध्ये आश्रयला आलेल्या साप व विंचू यांच्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरते. त्यातूनच ते वन्यप्राण्यांना मारतात. सध्या केरळमधील पूर ओसरल्याने तेथे मनुष्य आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. यासाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि वनविभाग यांची कुमक कमी पडत आहे.

ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी महाडमधून O.W.L.S. या संस्थेचे अध्यक्ष गणेश मेहेंदळे आणि सीस्केप या संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सात तरुणांचे एक पथक कोचीला रवाना झाले आहे. या पथकामध्ये योगेश गुरव, चिंतन वैष्णव, कुणाल साळुंखे, प्रणव कुलकर्णी, चिराग मेथा, नितीन कदम आणि ओंकार वारणकर या सर्पमित्रांचा समावेश आहे. नागरी वस्तीत अडकलेल्या वन्यजीवांना वाचवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर आहे. केरळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात आर्थिक, वैद्यकीय व अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. याचसोबत तेथील वन्यप्राण्यांच्या मदतीसाठी गेलेल्या या पथकाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

First Published on: August 24, 2018 5:00 AM
Exit mobile version