भिवंडीतील अंजूरफाटा रोड झाला मोकळा

भिवंडीतील अंजूरफाटा रोड झाला मोकळा

भिवंडी अंजूरफाडा रोड

 

शहरातील वर्दळीच्या अंजूरफाटा रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमणांवर सोमवारी पालिका प्रशासनाने धडक कारवाई केली. त्यामुळे रस्त्यांतील अडथळे दूर झाले असून नागरिकांची कसरत थांबली आहे. रेल्वेस्टेशन रोडवर दोन्हीं बाजूंना हातगाडी,कॅबिन ,पान टपरी,चप्पल ,ज्यूस सेंटर आदींसह लॉरी ,टेंपो बेकायदेशीरपणे उभी करून ठेवले जात होते. त्यामुळे येथील शुभ शांती कॉम्प्लेक्स ,मेघधारा ,हरीधारा ,गोल्डन पार्क ,गुरुदेव अपार्टमेंट ,अर्जुन सागर आदी निवासी वसाहतींमधील नागरिकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

याविरोधात शुभ शांती कॉम्प्लेक्स सोसायटीचे अध्यक्ष दिलीप जेठालाल पेथड ,सचिव प्रभुलाल गोसरानी,दिलीप गडा, अमृतलाल सुमारीया ,मनसुख मालदे ,राजेश हरिया,संदीप जाखरिया ,पंकज हरिया आदींसह शेकडो नागरिकांनी आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आयुक्तांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांनी अतिक्रमण विभागाच्या मदतीने धडक कारवाई करून रस्त्याच्या दोन्हीं कडेला असलेल्या टपऱ्या हटवून रस्ता मोकळा केला आहे.या कारवाईने नागरिकांच्या प्रवासातील अडथळे दूर झाल्याने नागरिकांनी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान आमच्या कॉम्पलेक्सच्या संरक्षण भिंतीच्या बाजूला आणखीही टपऱ्यांचे अतिक्रमण अजूनही आहे ते अतिक्रमण देखील मनपा प्रशासनाने काढून टाकावे आणि कॉम्प्लेक्स संपूर्णपणे अतिक्रमण मुक्त करावे अशी प्रतिक्रिया शुभ शांती कॉम्प्लेक्स सोसायटीचे अध्यक्ष दिलीप जेठालाल पेथड यांनी दिली .

First Published on: May 23, 2018 7:52 AM
Exit mobile version