मुंबईत १० वाजता सूर्यग्रहण सुरू होणार!

मुंबईत १० वाजता सूर्यग्रहण सुरू होणार!

प्रातिनिधिक छायाचित्र

येत्या २१ जून रोजी भारतात ग्रहणाची सुरूवात सकाळी ९.५८ वा भुज इथे खंडग्रास ग्रहणाने होईल व डिब्रुगड येथे दुपारी २.२९ मिनिटांनी समाप्त होईल. कंकणाकृती ग्रहणाची सुरवात भारताच्या पश्चिमेस घेरसाणा या शहरात ११.५० ला होईल आणि ते सुमारे ३० सेकंद दिसेल. मुंबईत ग्रहणाला सुरूवात सकाळी १० वाजता होईल. तर मुंबईत सूर्याचा ७० टक्के इतका भाग ११.३७ वाजता या कालावधीत व्यापला जाईल. मुंबईत सूर्यग्रहण संपण्याची वेळ दुपारी १.२७ वाजेपर्यंतची आहे. कंकणाकृती ग्रहणाच्या पट्यावर दिल्लीच्या उत्तरेतील कुरूक्षेत्र आणि देहारादून ही प्रमुख शहरे आहेत. उत्तराखंडातील कलंक शिखरावर सर्वात शेवटी कंकणाकृती ग्रहण दिसेल. ते होईल १२.१० वा आणि सुमारे २८ सेकंदांसाठी सूर्य कंकण दिसेल.

या पूर्वीची कंकणाकृती ग्रहणे भारतात १५ जानेवारी २०१० आणि २६ डिसेंबर २०१९ रोजी झाली होती. या नंतर भारतातून दिसणारं ग्रहण सुमारे २८ महिन्यांनी २५ ऑक्टोबर २०२२ रोजी असेल. पण तेव्हा फक्त भारताच्या पश्चिम भागातूनच हे दिसेल.

ग्रहण कसे बघावे आणि कसे बघू नये?

सूर्य हा प्रचंड प्रखर खगोलीय पदार्थ आहे. याच्या कडे नुसत्या डोळ्यांनी कधीच बघू नये. त्या मुळे तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकेल. ग्रहण बघण्यासाठी फक्त शास्त्रीय पद्धतीने बनवलेल्या गॉगलचाच उपयोग करा. साधे गॉगल सूर्यग्रहण बघण्यासाठी असुरक्षित असतात. वेगळ्या संस्था असे गॉगल बनवतात. पण सध्या ते सगळ्यांना मिळतील याची शक्यता कमी आहे.

हे मात्र अजिबात करू नका

कधीही सूर्याकडे नुसत्या डोळ्यांनी बघू नका. सूर्य प्रकाश खूप प्रखर आहे. आणि तुमच्या दृष्य पटलाला त्यामुळे कायमची इजा होण्याची शक्यता आहे. सूर्याचे प्रतिबिंब पाण्यातून कधीही बघू नये. तसेच काचेवर काजळी धरून त्यातून सूर्याकडे बघू नये. काचेतून जरी दृश्य प्रकाशाची तीव्रता कमी होत असली तरी त्यातून किरणे जाऊ शकतात जे आपल्या डोळ्यांना अपायकारक असू शकतात.

First Published on: June 20, 2020 8:35 PM
Exit mobile version