अॅपल कंपनीचे मुंबईतील पहिले स्टोअर सुरू

अॅपल कंपनीचे मुंबईतील पहिले स्टोअर सुरू

मुंबई | टेक विश्वात अधिराज्य करणाऱ्या अॅपल (Apple) कंपनीचे मुंबईतील पहिले स्टोअर आजपासून सुरू झाले आहे. अॅपल कंपनीचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांच्या हस्ते आज मुंबईतील (Mumbai) स्टोअर सुरू झाले आहे. तर अॅपलचे दुसरे स्टोअर दिल्लीत २० एप्रिल रोजी सुरू होणार आहे. यानंतर आता अॅपल कंपनीचे भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन मोठ्या शहरात स्टोअर असणार आहे.

नुकतेच अॅपल कंपनीला २५ वर्ष पूर्ण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात मुंबई आणि दिल्लीत दोन स्टोअर ओपन करून ते आनंद साजरा करत असल्याचे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. अॅपल कंपनीच्या मुंबई आणि दिल्ली दोन्ही स्टोअरची रचना ही स्थानिक प्रभावानुसार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अॅपल कंपनीचे सीईओ टिम कुक म्हणाले, “भारत हा एक सुंदर संस्कृतीने नटलेला देश आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी, स्थानिक समुदायांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि नवीन कल्पनांसह एक चांगले भविष्य घडवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.” तसेच भारतातून २०२२-२३ या आर्थिक वर्षात अॅपल निर्यात ५ अब्ज यूएस डॉलर ओलांडण्याची अॅपलची अपेक्षा आहे. तर हा आकडा भारतात बनवलेल्या फोनच्या निर्यातीपैकी निम्मा असल्याचे बोलले जाते.

असे आहे अॅपलचे मुंबईतील स्टोअर

अॅपलचे मुंबईतील स्टोअर हे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये आहे. अॅपलने वांद्रेतील स्टोअर हे १३३ महिन्यांच्या भाडेतत्त्वावर घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्या व्यतिरिक्त अॅपलकडे ६० महिन्यांसाठी ते भाडे वाढवण्याचा पर्याय आहे. मुंबईतील अॅपल स्टोअर हे २० हजार ८०६ चौरस फुटांचे आहे. या स्टोअरचे भाडे जवळपास ४२ लाख रुपये प्रति महिना आहे. तसेच अॅपलने त्यांचे फोन, लॅपटॉप, आयपॅड आदी उत्पादने अमेझॉन सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विकली आहेत.

टिम कुक पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार

वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील नवीन अॅप स्टोअरमध्ये ग्राहकांच्या स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी ट्वीट करत म्हटले आहे. टिम कुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेणार आहे. तसेच टिम कुक हे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची देखील भेट घेणार आहेत. त्यापूर्वी टिम कुक हे भारतात आल्यानंतर देशाचे श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी आणि कन्या ईशा अंबानी यांची भेट घेतली. त्यानंतर टीम कुक यांनी मुंबईमधील अनेक उद्योजक आणि सेलिब्रिटींची देखील भेट घेतली.

First Published on: April 18, 2023 2:32 PM
Exit mobile version