स्थलांतरीत मजुरांसाठी भरारी पथक नेमा; शरद पवार यांची सूचना

स्थलांतरीत मजुरांसाठी भरारी पथक नेमा; शरद पवार यांची सूचना

राज्य सरकारने स्थलांतरीत मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. शिवाय कोरोना संकटाच्या काळात या अपघाताने मनाला यातना झाल्याचे पवार यांनी म्‍हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन स्‍थलांतर करणाऱ्या मजुरांच्या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत. असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणी असलेल्या कंत्राटदाराने अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावे, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.

धोकादायक प्रवास करू नका : अजित पवार

परराज्‍यातील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्यासाठीची व्यवस्था होईपर्यंत मजूरबांधवांनी धीर धरावा. जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

First Published on: May 8, 2020 8:05 PM
Exit mobile version