आयडॉलसाठी प्रभावी संचालकाची नियुक्ती करा

आयडॉलसाठी प्रभावी संचालकाची नियुक्ती करा

विद्यापीठाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या आयडॉलकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. आयडॉलचे महत्त्व कमी व्हावे यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कायमस्वरुपी संचालक नेमण्याऐवजी प्रभारी संचालक नेमण्यात येत असल्याचा आरोप युवासेनेचे सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी मंगळवारी झालेल्या सिनेटच्या बैठकीत स्थगन प्रस्तावाद्वारे केला.

मुंबई विद्यापीठाकडे 22 महिन्यांपासून नॅक नाही. त्यातच आयडॉलमधील विद्यार्थ्यांची संख्येत घट होत असल्याचे सांगत थोरात यांनी विद्यापीठावर नॅकबरोबर नाकही शाबूत ठेवण्याची वेळ आली असल्याचा आरोप यावेळी केला. दोन वर्षांपूर्वी आयडॉलमध्ये 81 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे यावर्षी ही संख्या 67 हजारांवर आली आहे. 2005 पासून आयडॉलमध्ये विद्यापीठ प्रशासनाने एकही नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला नाही. आयडॉलमध्ये एमबीए, पत्रकारीता, लॉ, उद्यान विद्या, एम.ए. मानसशास्त्र असे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी दीड वर्षांपासून मागणी करत असूनही विद्यापीठाकडून हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले. अन्य मुक्त विद्यापीठ व संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम असून मुंबई विद्यापीठच हे अभ्यासक्रम सुरू का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यूजीसीच्या नियमावलीनुसार आयडॉलमध्ये प्रत्येक अभ्यासक्रमासाठी तीन पूर्णवेळ प्राध्यापक असणे आवश्यक असताना सर्व अभ्यासक्रमांसाठी फक्त सहाच पूर्णवेळ प्राध्यापक आहेत. 2020 मध्ये नॅक मिळाले नाही तर पुन्हा आयडॉलला मान्यता गमवावी लागेल. परीक्षा विभागातील गोंधळ व परीक्षा भवनमधील कर्मचार्‍यांकडून विद्यार्थ्यांना होणारा त्रास याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जगात मुंबई विद्यापीठाचे नाव चांगल्या प्रतीच्या, गुणवत्तेच्या विद्यापीठांमध्ये घेतले जाते. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आज ‘व्हाय चूज अस?’ असे म्हणण्याची वेळ मुंबई विद्यापीठावर आली आहे, असाही गंभीर आरोप अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केला.

First Published on: November 7, 2019 2:03 AM
Exit mobile version