पुरातत्व विभागाचा अजब फतवा

पुरातत्व विभागाचा अजब फतवा

Vasai fort

वसई:-ऐतिहासिक वास्तुंचे जतन, पूजन करणार्‍या दीपोत्सवाला बंदी आणि प्री-वेडींगच्या नावाखाली अर्ध नग्नावस्थेत शुटींग करणार्‍यांना संधी देण्यात येत असल्याच्या भूमिकेमुळे केंद्रीय पुरातत्व खात्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही बंदी जुगारून अनेक संघटनांनी वसईच्या किल्ल्यावर अखेर दीपोत्सव साजरा केला.नरवीर चिमाजी आप्पांच्या शौर्याने गाजलेल्या ऐतिहासिक वसईच्या किल्ल्यात प्री-वेडींग शुटींगच्या नावाखाली अर्धनग्नावस्थेत फोटो सेशन केले जात आहे. या सेशनमध्ये अश्लिल प्रकारही होत असल्यामुळे ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य नष्ट होते, अशी भूमिका घेऊन वसईतील विविध संघटनांनी पुरातत्व विभाग आणि पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. तसेच वसईचा किल्ला मद्यपी पर्यटक आणि जोडप्यांनी बरबटून टाकला आहे. पर्यटनाच्या नावाखाली ओल्या पार्ट्या आणि अश्लिल प्रकार घडत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे हा किल्ला श्रमदानाने स्वच्छ करण्याची मोहीम दुर्गमित्र आणि अनेक संघटनांना वारंवार हाती घ्यावी लागत आहे.

या मोहिमेत मद्याच्या रिकाम्या बाटल्या, चाखणाचे रिकामे कंटेनर्स, ड्रायफु्रटची पाकिटे, प्लास्टिकच्या पिशव्या, डागाळलेले कपडे आणि कंडोम वारंवार सापडत आहेत. त्यामुळे प्री-वेडींग शूट करणारे, मद्यधुंद पर्यटक आणि आंबट शौकीनांना मज्जाव न करणार्‍या पुरातत्व खात्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीत दीपोत्सव आणि भगवा झेंडा न लावण्याचा आदेश पुरातत्व खात्याने दुर्गमित्रांना दिला होता. या विरोधाला न जुमानता दिवाळीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. सुरुवातीला वसई किल्ल्यातील भुई दरवाजा आणि ध्वजस्तंभाला मशालीची मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ज्ञात-अज्ञात विरांच्या स्मरणार्थ दीपपूजन, मशालवंदना, बासरीवादन, शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी वसईचा किल्ला पताके, पणत्या आणि मशालींनी उजळून निघाला. दुर्गमित्रांसह किल्ले वसई मोहीम, उत्तर कोकण मोडीलीपी, युवाशक्ती प्रतिष्ठान, अनाम प्रेम परिवार, आगरी समाज, आमची वसई, विरार शिवसेना, हिंदवी स्वराज्य या संघटना दीपोत्सवात सहभागी झाल्या होत्या.

प्री-वेडींग शुटींगकडे दुर्लक्ष करण्यात येते आणि किल्ल्यांचे पावित्र्य जपणार्‍यांना बंदी घालण्यात येते ही बाब गंभीर आहे. समस्त दुर्गमित्रांच्या सहकार्याने यावर लवकरच आंदोलन करण्यात येईल,असे किल्ले अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी सांगितले. तर इतिहासाचे जतन करणार्‍यांवर बंदी घालण्याचे उद्योग पुरातत्व खात्याने बंद करावेत अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दिलीप पिंपळे यांनी दिला.

First Published on: November 12, 2018 1:44 AM
Exit mobile version