लुक आऊट नोटीसवर असलेल्या आरोपीस अटक

लुक आऊट नोटीसवर असलेल्या आरोपीस अटक

आरोपीला अटक

लुक आऊट नोटीसवर असलेल्या माधवन आरमुगम नावाच्या एका 30 वर्षांच्या आरोपीस सहार पोलिसांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. माधवन याच्याविरुद्ध नऊ वर्षांपूर्वी तामिळनाडू येथे एका घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असून याच गुन्ह्यात अटकेच्या भीतीने तो विदेशात पळून गेला होता. रविवारी कुवेतहून मुंबईत येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला ट्रॉन्झिट रिमांडवर तामिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याला घेऊन संबंधित पोलीस तामिळनाडुला निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

माधवन हा मूळचा तामिळनाडूचा रहिवाशी आहे. 19 मार्च 2009 रोजी त्याच्याविरुद्ध आम्मापोट्टाई तंजाऊर पोलीस ठाण्यात एक घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती, मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. तो विदेशात पळून गेल्याची माहिती प्राप्त होताच तामिळनाडू पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतातील सर्वच आंतरराष्ट्रीय विमानतळावर लुक आऊट नोटीस बजाविली होती. रविवारी माधवन आरमुगम हा कुवेत येथून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. यावेळी विमानतळावरील अधिकार्‍यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी तामिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.

त्याच्याविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याच्या अटकेची माहिती नंतर तामिळनाडू पोलिसांना देण्यात आली होती. सोमवारी तामिळनाडू पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत आले होते. माधवनला अंधेरी येथील स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची ट्रॉन्झिंट रिमांडची पोलिसांकडून मागणी करण्यात आली होती. या अर्जानंतर संबंधित पोलिसांनी चार दिवसांची ट्रॉन्झिंट रिमांडवर माधवनला सोपविण्यात आले. सायंकाळी त्याला घेऊन तामिळनाडू पोलीस पुढील चौकशीसाठी घेऊन गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: December 11, 2018 5:33 AM
Exit mobile version