पॉझिटिव्ह अहवाल येताच कोरोना रुग्णाने काढला पळ

पॉझिटिव्ह अहवाल येताच कोरोना रुग्णाने काढला पळ

कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल बघून घाबरलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने घराला कुलूप लावून कुटुंबासोबत पोबारा केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील पोखरण रोड, गांधी नगर परिसरात घडली. या कोरोनाबाधिताला रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलेल्या आरोग्य पथकाला रुग्ण मिळून न आल्यामुळे अखेर त्याच्या विरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी चितळसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा शोध घेतला असता तो  कुटुंबियांसह बिहार येथे गेल्याचे समोर आले.

ठाण्यातील पोखरण रोड, गांधी नगर परिसरात नागरिकांची गांधी नगर आरोग्य केंद्राकडून कोरोना तपासणी करण्यात आली होती. १३ जून रोजी आलेल्या कोरोना तपासणीच्या अहवालात गांधी नगर येथील एका चाळीत राहणारा ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. गांधी नगर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोनाबाधित व्यक्तीला फोन करून कोरोना रुग्णलायात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका पाठवत असल्याचे कळवले होते.

रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथक कोरोना रुग्णाला घेण्यासाठी गेले असता तत्पूर्वीच तो कुटुंबियांसह  घराला कुलूप लावून पळून गेल्याचे समजले. आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी बाधीत रुग्णाच्या मोबाईल फोनवर कॉल केला. मात्र त्याचा मोबाईल फोन बंद असल्यामुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता तो कुठे व कधी गेला याबाबत शेजाऱ्यांना देखील माहीत नव्हते.

पळून गेलेली व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे तो ज्या ठिकाणी जाईल, तसेच ज्या व्यक्तीच्या संपर्कात येईल तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव होईल, या भीतीने त्याच्या शोध घेण्यासाठी  वैद्यकीय अधिकारी यांनी चितळसर पोलीस ठाण्यात पळून गेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाविरुद्ध तक्रार दाखल केली. चितळसर पोलिसांनी भा.द.वि.कलम १८८ ,२६९,२७० सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७, २,३ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी पळून गेलेल्या या रुग्णाचा शोध घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडे संपर्क साधला असता हा रुग्ण आपल्या कुटुंबियांसह त्याच्या गावी बिहार येथे गेल्याचे समजले. पोलिसांनी बिहार पोलिसांची मदत घेऊन या रुग्णाचा शोध घेऊन बिहार येथेच त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली. ठाणे येथून बिहारला जाताना कोरोना बाधीत व्यक्ती किती जणांच्या संपर्कात आला असेल याची चिंता वाढली असून संपर्कातील व्यक्तींना शोधले जात आहे.

First Published on: June 15, 2020 5:49 PM
Exit mobile version