महापालिकेचे नालेसफाईचे दावे म्हणजे रतन खत्रीचे आकडे; आशिष शेलारांचा आरोप

महापालिकेचे नालेसफाईचे दावे म्हणजे रतन खत्रीचे आकडे; आशिष शेलारांचा आरोप

मुंबई: मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामात निष्काळजीपणा दाखवत केवळ २५ ते ३० टक्के एवढीच केली आहे. त्यामुळे पालिकेने नालेसफाई कामांबाबत दिलेले आकडे हे खोटे व रतन खत्रीचे आकडे आहेत. या नालेसफाई कामांबाबत आपण असमाधानी आहोत, अशी बोचरी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार यांनी, मुंबई महापालिकेने स्वतः व कंत्राटदारांच्या मार्फत पश्चिम उपनगरातील काही ठिकाणी केलेल्या नालेसफाई कामांचा शुक्रवारी पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांनी पश्चिम उपनगरातील साऊथ एव्हेन्यू नगर, गझदर बांध नाला, पवन हंस नाला व एस.एन.डी.टी. नाला, गजधर बांध पंपिंग स्टेशन, मिलिनेयम क्लब जवळ इर्ला नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला आदी नाल्यांची पाहणी केली.
याप्रसंगी, भाजपचे आमदार अमित साटम, भारती लवेकर माजी नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, उज्वला मोडक, अभिजित सामंत, हेतल गाला, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, योगिराज दाभाडकर, आदींसह पालिका वाँर्ड अधिकारी विनायक विसपुते यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.

राहुल नगर नाल्यात सफाईचे कामच झालेले नाही. गझदरबंध नाल्याचे काम आज सुरु केले आहे. आजच जेसीबी लावत तिथे गाळाचा अंदाज घेतला गेला. तर गझदरबंध पंपिंग स्टेशन समोर गाळाचे ढीग लागले आहेत. एसएनडीटी नाल्याचे काम ही नुकतेच सुरू झाले असून बेस्ट काँलनी नाल्यात वनस्पती उगवलेल्या दिसत आहेत. प्रत्यक्षात केवळ २५ ते ३० टक्के काम झाले असताना महानगर पालिका करत असलेले ७० ते ८० टक्के सफाईचे दावे म्हणजे रतन खत्रीचे आकडे आहेत, असा आरोप आमदार शेलार यांनी केला आहे.

नालेसफाई कामे करणारे उद्धव ठाकरेंच्याच जवळचे
मुंबईत गेले २५ वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मुंबईतील नालेसफाई कामांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे गेले काही वर्ष सातत्याने भाजप सर्व नाल्यांची पाहणी महापालिकेचे अधिकारी, नगरसवेक यांच्या सह करत आहे. यातून मुंबईकरांची सेवा आम्ही करतोय. पालिकेचे सर्व दावे कंत्राटदारांच्या जीवावर होत आहेत. नालेसफाई कामात पालिकेचा अक्षम्य निष्काळजीपणा सुरू आहे. नालेसफाईच्या २८० कोटीं पेक्षा जास्तच्या कामासाठी जे कंत्राटदार नियुक्त केले आहेत ते उद्धव ठाकरेंच्याच जवळचे, त्यांच्याच सत्ता काळातील आहेत. त्यांच्यावर आमचा, मुंबईकरांचा भरवसा नाही, अशा शब्दात आमदार शेलार यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

नालेसफाई कामात हातचलाखी
आम्ही या कामाबाबत असमाधानी आहोत. कंत्राटदार गाळ मोजणीतच हातचलाखी करत आहे. उद्धवजींच्या जवळच्या कंत्राटदाराने भ्रष्टाचार केला आहे. यावर चाबुक घेऊन मुंबईकरांना सेवा देण्याच काम भाजपा करील आहे, असा आरोप आमदार शेलार यांनी केला.

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका
आदित्य ठाकरेंची भाषा आम्ही गेले काही दिवस पाहत आहोत. माझ्या वडिलांच्या काळात गेले २५ वर्ष ज्यांना काम मिळत होतं. त्यांना आता कामे का मिळत नाहीत, अशी कंत्राटदारांची वकिली करणारी त्यांची भाषा आहे. या नालेसफाईत तुमच्या जवळचे, तुमच्या काळातले, कट कारस्थान करणारे कंत्राटदार आजही काम करत आहेत. तुमच्या जवळच्या असलेल्या कंत्राटदारांच्या कामातून शहरात पाणी तुंबणार नाही, अशी शाश्वती तुम्ही मुंबईकरांना देणार का ?असा थेट सवाल त्यांनी यावेळी आदित्य ठाकरेंना केला आहे.

First Published on: May 12, 2023 10:34 PM
Exit mobile version