FB Live: मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो ३ सक्षम पर्याय

FB Live: मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो ३ सक्षम पर्याय

अश्विनी भिडे

शिक्षण, मुंबईतील वाहतूक प्रकल्प, पर्यावरण, काम आणि कौटुंबिक समतोल ते राजकीय पक्षांना सोबत घेऊन काम करणे अशा अनेक मुद्द्यांवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिक अश्विनी भिडे यांनी आज माय महानगरच्या फेसबुकच्या लाईव्ह दरम्यान चर्चा केली. मुंबईसारख्या महानगरातील वाहतूकीच्या समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक आव्हानात्मक होत आहेत. अशावेळी पर्यायी वाहतूकीच्या प्रकल्पांसाठी पुढाकार घेतला नाही तर वाहतूक कोंडीची समस्या आणखी मोठी होणार आहे. म्हणूनच मुंबईसारख्या महानगरातील सध्याच्या वाहतूकीच्या पर्यायांमध्ये आणखी एक उत्तम पर्याय म्हणून मेट्रो ३ हा प्रकल्प ठरेल, असा विश्वास अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.

सध्या लोकल ट्रेनमध्ये गर्दीचे लोंढे यांना पर्याय म्हणून अनेक प्रवाशांनी खाजगी ओला आणि उबर यासारख्या टॅक्सी सेवेचा पर्याय निवडला आहे. म्हणून जोपर्यंत नवीन वाहतूकीची व्यवस्था मुंबईसारख्या शहरात होत नाही, तोवर मुंबईकरांची वाहतूक कोंडी सुटणार नाही असेही त्या म्हणाल्या. मुंबई शहरात आगामी दशकात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊनच मुंबईत भूयारी आणि एलिव्हेटेड अशा मेट्रो प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईसारख्या मोठ्या मेट्रो शहरांमध्ये म्हणूनच मेट्रोचा पर्याय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

अश्विनी भिडे यांची मुलाखत घेताना आपलं महानगर आणि माय महानगरचे मुख्य संपादक संजय सावंत (फोटो -संकेत शिंदे)

प्रकल्प मार्गी लावण्यास संवाद महत्त्वाचा

अनेकदा सार्वजनिक प्रकल्प अमलात आणताना तुमचे पद आणि मोठेपण पुरेसे नसते. त्यासाठी उत्तम संवाद साधणे ही देखील तितकीच महत्वाची गरज असते. मुंबईत अनेक धर्मियांची धार्मिक स्थळांचे शहरातील विविध वाहतूक प्रकल्पात पुर्नवसन करण्यात आले आहे. धार्मिक भावना महत्वाच्या असतातच पण शहराचा विकासही तितकाच महत्वाचा असतो. अनेक प्रकल्पात सुरूवातीला विरोध झाला खरा पण योग्य संवादामुळे हे विषयही मार्गी लागले. म्हणूनच प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असतो, असेही त्यांनी सांगितले.

कार डेपोसाठी आरेची जागाच उत्तम

आरे प्रकल्पाच्या निमित्तानेही अनेक पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. पण विरोध केवळ माध्यमांपूरता मर्यादित राहिला. आरे कारशेडसाठी विरोध करणाऱ्यांनी सोशल मिडिया वापरून वैयक्तिक मोबाईल क्रमांक व्हायरल करण्याचेही प्रकार केले. मात्र एखाद्या प्रकल्पात चांगले मुद्दे मांडणारे पर्यावरणवादी हे खूपच कमी असतात. अनेकदा विरोधाचे मुद्दे माध्यमांपर्यंतच राहतात. थेट चर्चेसाठी मात्र अशा मुद्द्यांना घेऊनच पर्यावरणवादी सहसा पुढे येत नाहीत, असाही अनुभव त्यांनी यावेळी मांडला. आरेमध्ये कारशेड झाले नाही तर मेट्रोचा प्रकल्पच पुर्ण होऊ शकत नाही. मेट्रोच्या प्रकल्पात धावणाऱ्या ट्रेनच्या देखभाल दुरूस्तीसाठी कारशेड महत्वाचा आहे. तसेच टर्मिनलच्या शेवटच्या ठिकाणी कारशेड असणे गरजेचे असते. मुंबईतली मेट्रो ३ ही सिप्झपर्यंत येणार आहे. त्यामुळेच मुंबईत आरे येथील क्षेत्र सोडले तर कुठेच कारशेड डेपोसाठी जागा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नंतर शिवसेनेचाही विरोध मावळला

मेट्रो प्रकल्पाबाबत राजकीय नेतेमंडळींचा सुरूवातीला विरोध होता. पण प्रकल्पाबाबतची योग्य बाजू मांडल्यानंतर हा विरोध मावळला असा अनुभव आहे. प्रकल्पाबाबतच्या अर्धवट माहितीमुळे शिवसेनेनेही सुरूवातीला या प्रकल्पासाठी विरोध केला. मात्र शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापुढे प्रकल्पाची माहिती सविस्तर सादर केल्यानंतर हा विरोध मावळला असेही त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: October 5, 2018 7:03 PM
Exit mobile version