श्रेयाच्या वाटमारीत कोस्टलरोडचे भूमिपूजन उध्दव ठाकरेंच्या हस्ते

श्रेयाच्या वाटमारीत कोस्टलरोडचे भूमिपूजन उध्दव ठाकरेंच्या हस्ते

Coastal Road

सागरी किनारी रस्ता(कोस्टल) प्रकल्प प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू झाली आहे. या कोस्टल रोडचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व्हावे, अशी भाजपाची इच्छा असली तरी शिवसेना मात्र आपले पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याच हस्ते या रोडचे उद्घाटन करणार आहे. पंतप्रधानांचे राज्यात आगमन होण्यापूर्वीच उध्दव ठाकरे यांच्या हस्ते कुदळ मारून रविवारी सेनेकडून भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला जाणार आहे.

शामलदास गांधी मार्गाच्या (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूलापासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंतच्या 9.98 कि.मी लांबीच्या सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार तसेच कंत्राटदार कंपनीची नुकतीच निवड करण्यात आली आहे. सुमारे 1200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्यानंतर कंपन्यांच्यावतीने प्रकल्पाच्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स उभारण्यात आली आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन १८ तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार्‍या या कार्यक्रमाआधीच कोस्टलरोडचे उद्घाटन उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उरकण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. रविवारी 16 डिसेंबर यादिवशी या कोस्टल रोडचे भूमिपूजन भुलाभाई देसाई रोड इथल्या अमलसन्स उद्यान येथे उध्दव ठाकरे यांच्याहस्ते करण्याचे निश्चित झाले आहे. याबाबतची निमंत्रण पत्रिकाही बनली आहे. कार्यक्रमाची पूर्ण तयारीही विभागाने केली असल्याची माहिती मिळत आहे.

कोस्टल रोड हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. काही भाग महापालिका तर काही भाग राज्य सरकारच्यावतीने उभारला जाणार आहे. मात्र या कोस्टल रोडचे श्रेय राज्य सरकारला म्हणजे भाजपला देण्यास शिवसेना तयार नाही. या कामाचे श्रेय आपल्या पक्षाला मिळावे, म्हणून या कार्यक्रमाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा हट्ट भाजपचा आहे. त्यामुळे त्याआधीच भूमिपूजनाचे श्रीफळ उध्दव ठाकरे यांच्याहस्ते वाढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे सांगण्यात येते.

First Published on: December 15, 2018 5:09 AM
Exit mobile version