गरबा खेळणार्‍या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गरबा खेळणार्‍या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

प्रातिनिधिक फोटो

मुंबई : नवरात्रोत्सवानिमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी दांडिया-रासगरब्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सर्व वयोगटातील महिला-पुरुषांची रात्रीपर्यंत वर्दळ होती. मात्र याच वर्दळीत लिंगपिसाटांचाही वावर होता. त्यातील एका नराधमाने गरबा खेळण्यासाठी आलेल्या एका ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार साकीनाका परिसरात घडला. यानंतर पोलिसांनी लागलीच २४ तासाच्या आत नराधमाला गजाआड केले. सिराज हसन मेहंदी असे या नराधमाचे नाव आहे.

सध्या हा आरोपी साकीनाका पोलिसांच्या ताब्यात आहे. साकीनाका परिसरात राहणारी 11 वर्षीय पिडीत मुलगी 17 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री 9 वाजता जरीमरी येथे दांडिया खेळायला जात होती. त्यावेळी जरीमरी येथे दुचाकीवर बसलेला आरोपी सिराज हसन मेहंदी याची नजर मुलीवर पडली. त्याने आजुबाजुला कोणी नसल्याचे पाहून मुलीचे तोंड दाबून तिला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोत नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेमुळे भेदरलेल्या मुलीने आईला फोन करून सर्व हकीकत सांगितली. पोटच्या मुलीच्या बाबतीत हा भयंकर प्रकार घडल्याने पिडीत मुलीची आई शेजार्‍यासोबत घटनास्थळी दाखल झाली. या घटनेमुळे साकीनाका परिसरात एकच खळबळ उडाली. शेजार्‍यासोबत काही लोकांनी आरोपीला त्या परीसरात शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तो फरार झाला होता.

या प्रसंगानंतर मुलीच्या आई-वडीलांनी साकीनाका पोलीस ठाणे गाठले. घडलेल्या प्रकारानुसार साकीनाका पोलिसांकडे तक्रार करुन रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लागलीच ६ पथके तयार केली. पोलिसांनी आजुबाजुच्या परिसरात असणार्‍या एकूण ५५ सीसीटिव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले पण कोणतीच ठोस माहिती पोलिसांनी मिळाली नाही. त्यामुळे अखेर पिडीत मुलीने केलेल्या वर्णनानुसार आरोपीचे स्केच बनवून खबर्‍यांना कामाला लावण्यात आले. साकिनाक्यातील सर्व विभागात पोलिसांनी मोहिम सुरु केली. उपलब्ध स्केचनुसार खबर्‍यांच्या मदतीने पोलिसांनी साकीनाका परीसरातून एकूण १५ जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी सुरु केली. पोलिसानी खाक्या दाखवताच या १५ जणांतील आरोपी सिराज हसन मेहंदी याने आपला गुन्हा कबुल केला.

पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे २४ तासांच्या आत आरोपी गजाआड झाला. मुंबई पोलिसांची टिम सणासुदिच्या दिवशी कसलाही विचार न करता रात्रंदिवस कार्यरत असते. या गुन्हाची उकल गुन्हा परिमंडळ 10 चे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील माने आणि इतर पथकाने केली.

First Published on: October 19, 2018 4:14 AM
Exit mobile version