बदलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग

बदलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग

BK Chemicals fire

बदलापूर एमआयडीसीतील बी के केमिकल्स या कंपनीला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे कंपनीतील मालाचे व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीची झळ शेजारील तीन ते चार कंपन्यांना बसून त्यांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बदलापूर पूर्वेकडील खरवई भागात असलेल्या बी के केमिकल्स या कंपनीला गुरुवारी रात्री 1.30 वा च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. याबाबत माहिती मिळताच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. बदलापुरात राहत असलेले अंबरनाथ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर भागवत सोनोनेही घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी मदत केली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले तेव्हा अक्षरशः आगीचे डोंब उसळत होते. त्यामुळे आगीची तीव्रता लक्षात घेऊन अंबरनाथ, आनंदनगर एमआयडीसी, उल्हासनगर व कल्याण डोंबिवली महानगर पालिका आदींच्या अग्निशमन दलालही पाचारण करण्यात आले. या सर्वानी मिळून दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवले व पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आग विझवण्यात यश आले.

आग लागली त्यावेळी कंपनीत दोन कामगार होते. त्यांनी तात्काळ तेथून पळ काढल्यामुळे ते बचावले. तसेच या आगीची झळ बसून शेजारील इतर तीन चार कंपन्यांचेही नुकसान झाले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी वा कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर आर. बी. पाटील यांनी दिली. ही आग कशामुळे लागली? कंपनीत कोणत्या प्रकारचे उत्पादन होत होते. इथे किती कामगार काम करीत होते. याबाबत माहिती देण्यासाठी कंपनीकडून कोणीही उपलब्ध न झाल्याने याबाबत अद्याप काहीही समजू शकले नसल्याचेही आर बी पाटील यांनी स्पष्ट केले.

अग्निशमन दलाची गाडी नादुरुस्त
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त असल्याने अंबरनाथ नगर परिषदेकडून काही दिवसांसाठी अग्निशमन गाडी देण्यात आली आहे. ही नादुरुस्त झालेली गाडी आता दुरुस्त झाली असून ती आणण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर आर बी पाटील शुक्रवारी स्वतः पुण्याला गेले.

First Published on: March 16, 2019 4:10 AM
Exit mobile version