काँग्रेस सरकारमध्ये समाधानी नाही? बाळासाहेब थोरातांनी बोलून दाखवली खदखद!

काँग्रेस सरकारमध्ये समाधानी नाही? बाळासाहेब थोरातांनी बोलून दाखवली खदखद!

गेल्या काही दिवसांपासून ज्या मुद्द्यावर मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू होती, त्यावर अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं आहे. ‘आम्ही देखील सरकारमधले घटकपक्ष आहोत. त्यामुळे आम्हाला ही निर्णय प्रक्रियेत स्थान हवंय’, अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे. तसेच, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्याविषयी बाजू मांडणार असल्याचं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी देखील ‘महाराष्ट्रात काँग्रेस फक्त पाठिंबा देत असून निर्णय प्रक्रियेत काँग्रेस कमांडिग स्थितीत नाही’, अशी जाहीर भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीत भांड्याला भांडं लागू लागल्याचीच ही चिन्ह असल्याचं बोललं जात आहे.

याआधी देखील अनेकदा तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेत असल्याचे दावे विरोधकांकडून केले गेले होते. मात्र, सरकारमध्ये सारंकाही आलबेल असल्याचं ठामपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलं होतं. पण बाळासाहेब थोरात यांच्या या भूमिकेमुळे आता आघाडीत मिठाचा खडा पडलाय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘आम्ही देखील सरकारमधले घटकपक्ष आहोत. आमच्या काही मागण्या आहेत. त्या आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडणार आहोत. आमचा पक्ष म्हणून ज्या आमच्या मागण्या आहेत, त्या महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या आहेत. निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान हवं ही आमची मागणी आहे’, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आघाडीतली बिघाडी पहिल्यांदाच जाहीरपणे समोर आली आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्री आणि नेत्यांची आज बैठक झाली असून त्या बैठकीमध्ये या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीला मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. त्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिल्यामुळे काँग्रेसचा सत्तेत असलेला एक गट अजूनही त्यांना मिळत असलेल्या हिश्श्याबाबत असमाधानी असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त जागांची नियुक्ती आणि महामंडळांचं वाटप, यामध्ये अधिकचा वाटा मिळावा, यासाठी काँग्रेसकडून हे दबावतंत्र वापरलं जात असल्याचं देखील बोललं जात आहे.

First Published on: June 11, 2020 6:13 PM
Exit mobile version