शेतकऱ्यांचा आक्रोश चिरडून टाकण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरूय – बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांचा आक्रोश चिरडून टाकण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरूय – बाळासाहेब थोरात

राज्यघटनेने विविध जाती धर्मांच्या लोकांना कोणताही भेदभाव न मानता सामावून घेतले. सर्वांना समान हक्क, अधिकार दिला. देश राज्यघटनेच्या मुलभूत तत्वानुसार चालतो परंतु मागील सहा वर्षापासून हुकुमशाही वृत्तीच्या केंद्रातील सत्ताधा-यांकडून या तत्वांना तिलांजली देण्याचे, त्याला धक्का लावण्याचे काम केले जात आहे. जगातील श्रेष्ठ व पवित्र राज्यघटना अबाधित ठेवण्याची, तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन ठेपली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात पार पडला. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला सेवादलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

थोरात पुढे म्हणाले की, घटनेतील समतेचे तत्व हेच काँग्रेस पक्षाचे तत्व आहे. या मुलभूत तत्वांना हरताळ फासण्याचे काम अलिकडच्या काही वर्षात सुरु झालेले आहे. देशातील सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत आता चर्चा न होताच कायदे मंजूर केले जातात. कृषी कायदे व कामगार कायद्यासंदर्भात कोणतीही चर्चा न करताच ते बदलून कामगार, शेतकरी, शेतमजूर यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम झाले आहे. याविरोधात देशभर आक्रोश सुरु आहे परंतु तो आक्रोशही चिरडून टाकण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. मोठ्या संघर्ष व बलिदानाने देश स्वतंत्र झाला असून याच दिवशी १९५० साली प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य आले ते टिकवण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे, असेही थोरात म्हणाले.

 

First Published on: January 26, 2021 2:36 PM
Exit mobile version