वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे बॅरिकेट्स पावसाळ्याआधी हटणार

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे बॅरिकेट्स पावसाळ्याआधी हटणार

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे

दररोज वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रवास करणार्‍या मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी. येत्या पावसाळ्याआधीच संपूर्ण रस्त्यावरील बॅरिकेड्स काढणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत जाहीर करण्यात आले आहे. दहिसर ते डी.एन. नगर मेट्रो मार्ग २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ च्या कामासाठी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सर्व स्थापत्य कामे ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिले आहेत. या दोन्ही मार्गावरील सुरू असणार्‍या कामांचा नुकताच आढावा घेतल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले आहेत.

अनेक अडथळ्यांना सामोरे जाताना दोन्ही मार्गिकांवरील कामे ही झपाट्याने मार्गी लागली आहेत. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या मार्गिकांवर पाया उभारणीचे काम हे ८५ टक्के पूर्ण झाले आहे. तर मेट्रोसाठीचे पिलर उभारणीचे काम ६९ टक्के आणि गर्डर उभारणीचे काम हे ५० टक्के पूर्ण झाले आहे. या कामादरम्यान विविध यंत्रणांच्या वाहिन्यांचे जाळ स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जलवाहिन्या, गॅस वाहिन्या, विद्युत वाहिन्या, दूरध्वनीच्या वाहिन्या या यशस्वीपणे स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत.

मेट्रो ऑन ट्रॅक
सध्या दोन्ही मेट्रोच्या स्थानकांची कामे सुरू आहेत. या मेट्रो मार्गिकांसाठी सध्या रूळदेखील प्राप्त झाले असून ट्रॅक बांधणीचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. मेट्रोशी संबंधित सर्व यंत्रणांनी या कामाला गती देण्यासाठी उत्तम सहकार्य केले आहे. सल्लागार, कंत्राटदार आणि अधिकार्‍यांनी या कामात जातीने लक्ष घालून दोन्ही मार्गिका प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश दराडे यांनी दिले आहेत.

First Published on: January 14, 2019 4:35 AM
Exit mobile version