बंगालच्या उपसागराचे महाराष्ट्रात उधाण

बंगालच्या उपसागराचे महाराष्ट्रात उधाण

संपादकीय

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला की, देशभरात अचानक पाऊस सुरू होतो आणि सगळ्यांची तारांबळ उडते, तसेच काहीसे सध्या महाराष्ट्रात झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी महाराष्ट्रात आल्या आणि बुधवारी महाराष्ट्रात अचानक पाऊस सुरू झाला. या पावसाची पूर्वसूचना वेधशाळेलाही देता आली नाही. म्हणजे या पावसाने सगळ्यांचा अंदाज चुकवला. ममता बॅनर्जीही अनपेक्षितपणे महाराष्ट्रात आल्या. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. त्यातून काय निष्पन्न होणार हे पुढील काळात कळेल. पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वशक्ती पणाला लावूनही त्यावर मात करून ममता बॅनर्जी यांनी तेथील आपली सत्ता कायम राखली. पश्चिम बंगालमध्ये कुठल्याही परिस्थितीत ममतांचा पराभव करून तेथील सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची यासाठी मोदींनी भाजपशासित सगळ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना कामाला लावले होते. इतकेच नव्हे तर आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होण्यासाठी खास जबाबदारी दिली होती.

नरेंद्र मोदी यांनी अनपेक्षितपणे लांब दाढी ठेवली, यामागेही पश्चिम बंगालमध्ये विजयाची पूर्वतयारी अशीच चर्चा होती. बंगाली जनमनावर देशभक्त आणि महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे रवींद्रनाथांसारखी लांब दाढी ठेवून बंगाली जनतेच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न मोदींनी केला, असे म्हटले जाते. कारण दाढी बढाके कोई रवींद्रनाथ टागोर नही बनता, अशी टीकाही विरोधकांनी मोदींवर केली होती. थोडक्यात काय तर मोदींनी ममतांना पराभूत करण्यासाठी सगळे प्रयत्न करूनही त्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळेच आपण एकप्रकारे मोदींचे सगळे प्रयत्न हाणून पाडले आणि त्यांच्यावर विजय मिळवला, असा आत्मविश्वास ममता बॅनर्जी यांच्या मनात निर्माण झाला.

त्याच वेळी महाराष्ट्रात जे भाजपचे कडवे विरोधी पक्ष आहेत, त्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रचंड ममतांच्या विजयांचा प्रचंड आनंद झाला. कारण तिथे मोदींनी आपली सगळी ताकद लावूनही भाजपला सत्ता मिळवता आली नाही. कारण यावेळी आम्हीच सत्तेत येणार असे भाजपला वाटत होते. मोदींनी सर्व ताकद लावूनही बंगालमध्ये भाजपची डाळ आपण शिजू दिली नाही, यामुळेच आता आपण राष्ट्रीय पातळीवरही मोदींना शह देऊ शकतो आणि भाजपला पराभूत करू शकतो, असा विश्वास ममता बॅनर्जी यांच्यामध्ये निर्माण झाला आहे. पण ते काम एकट्या तृणमूल काँग्रेसला शक्य होणार नाही, त्यामुळे ममतांना देशभरातील प्रादेशिक पक्षांची गरज आहे. त्यासाठी त्यांचा सगळा खटाटोप सुरू आहे. प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करून दिल्ली काबीज करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

मोदींच्या करिश्म्यामुळे २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत आमचीच सत्ता येणार, आता ही निवडणूक एक औपचारिकता आहे, त्यामुळे मी पुन्हा येईन, असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांना वाटत होता. पण शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम राहिली. त्यांनी त्यासाठी काहीही करायची तयार ठेवली, त्यामुळेच महाराष्ट्रात अकल्पित अशी महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले. महाराष्ट्रात सत्तेचा असा फॉर्म्युला अस्तित्वात येईल, याची राजकीय विश्लेषकांसह कुणालाच कल्पना नव्हती, पण तसे झाले. त्यामुळे भाजपला प्रचंड धक्का बसला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्येसाठी त्यांना काँग्रेसच्या पाठिंब्याची किंवा सहभागाची गरज लागणार. जिथे शिवसेना आहे, त्या आघाडीत काँग्रेस येणार नाही, अशी भाजपला खात्री होती. त्यामुळेच शिवसेना २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे आपल्या मागून येईल, असे वाटले होते. पण तसे झाले नाही. काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली. अशक्य वाटणारी गोष्ट महाराष्ट्रात शक्य झाली होती.

महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य भाजपच्या हातून काढून घेऊन मोदींना पहिला शह महाराष्ट्रातून दिला गेला होता. या सगळ्याचे सूत्रधार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील मातब्बर नेते शरद पवार. त्यांनी यापूर्वीही महाराष्ट्रात असे विविध राजकीय प्रयोग करून सत्ता काबीज केली होती. त्यामुळेच ममता बॅनर्जींचा शरद पवार यांच्या या राजकीय कौशल्यावर प्रचंड विश्वास आहे. कारण पवार काहीही करू शकतात आणि भाजपची सत्ता घालवू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच पुढील काळातही राष्ट्रीय पातळीवर मोदींचा पाडाव करण्यासाठी शरद पवारच काही तरी करू शकतात, याची खात्री वाटत असल्यामुळे ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्या. त्यांनी प्रथम मुंबईतील प्रसिध्द आणि अनेक सेलिब्रिटींच्या जीवनात कायापालट केल्याची भावना आहे, अशा सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर जय मराठा, जय बांगला, असा नारा दिला.

त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती; पण ते सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्यामुळे त्यांना भेटता आले नाही. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून भाजपची सत्ता घालवण्यात सिंहाचा वाटा असलेले खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे भला मोठा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ममता बॅनर्जी यांनी राज्यात ज्यांनी सत्तापालट केला, त्याचे सूत्रधार असलेले शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बुधवारी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत मोदीविरोधी आघाडीसाठी देशातील प्रादेशिक पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

देशातील प्रादेशिक पक्षांना एकत्र करून केंद्रात सत्ता स्थापन करण्याचे शरद पवार यांनी यापूर्वी काही वेळा प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी त्या पक्षांच्या एकत्रित महाबैठका घेतल्या होत्या. पण त्यात पंतप्रधानपदासाठी अनेक महत्वाकांक्षी नेते असल्यामुळे तिसरी आघाडी अस्तित्वात येण्याअगोदरच त्याच्या चिरफळ्या उडाल्या. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता घालवण्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांना यश आले आहे. त्याच यशाचा विस्तार आता त्यांना राष्ट्रीय पातळीवर करायचा आहे, त्यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे. त्यासाठीच ममता बॅनर्जी महाराष्ट्रात ठाकरे, पवारांच्या भेटीला आल्या आहेत.

महाराष्ट्रात पवारांनी भाजपची सत्ता घालून मोदींना शह देण्याची संधी आहे, हे लक्षात आणून देऊन काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेतले. पण या सत्तेत काँग्रेसची दुय्यम भूमिका आहे. पुढील काळात राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या विरोधात आघाडी स्थापन करायची असेल तर त्यात काँग्रेसचा सहभाग किंवा पाठिंबा लागेल; पण केंद्रात काँग्रेस दुय्यम भूमिका घ्यायला तयार होईल, असे वाटत नाही. कारण त्यांना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासाठी काँग्रेसला आपल्या दावणीला बांधण्याचे मोठे आव्हान असणार आहे, ते त्यांना कसे शक्य होते, यावर त्यांच्या पुढील स्वप्नांचा डोलारा आधारलेला आहे.

First Published on: December 2, 2021 5:10 AM
Exit mobile version