जीव धोक्यात टाकून दरोडेखोराला पकडणाऱ्या बीट मार्शलचा सत्कार

जीव धोक्यात टाकून दरोडेखोराला पकडणाऱ्या बीट मार्शलचा सत्कार

एका संशयित मोटारीचा ३ किलोमीटर पाठलाग करून दोन शस्त्रधारी दरोडेखोरांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. एकट्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून शस्त्रासह दरोडेखोराला पकडणाऱ्या वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यातील बीट मार्शलचा मुंबई पोलीस आयुक्तांनी सत्कार केला. या बीट मार्शलला २० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. राजकीरण बिळासकर असे या बीट मार्शलचे नाव आहे. बिळासकर हे वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे.

असा केला पाठलाग

रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास राजकीरण बिळासकर हे मोटार सायकलवरून आपल्या हद्दीत गस्त घालत होते. त्या दरम्यान आणिक आगार येथून एक संशयित भरधाव वेगात कारने भक्तीपार्कच्या दिशेने जात असताना बिळासर यांनी या गाडीचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस बघून कारमधील चालकाने कार आणखी सुसाट पळवली. दरम्यान, बिळासकर यांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी आपली मोटारसायकलने या कारचा पाठलाग सुरू केला. पोलीस आपला पाठलाग करीत असल्याचे बघून चालकाने थेट मोटार पूर्व मुक्त मार्ग (फ्रीवे) वर चढवली.

एका आरोपीला केली अटक

पोलीस शिपाई बिळासकर यांनी देखील आपली मोटारसायकल पूर्व मुक्त मार्गावर चढवून कारचा पाठलाग सुरू ठेवला. त्यानंतर या कार चालकाने मोटार फ्री वे वरून खाली आणली आणि प्रतीक्षानगरच्या दिशेने पळवली. बिळासकर यांनी पाठलाग करत प्रतीक्षा नगर येथे आले असता कार चालकाने मोटारीतून तलवारसह बाहेर येऊन बिळासकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिळासकर यांनी तो हल्ला परतवून लावला. दरम्यान बिळासकर यांच्या मदतीला प्रतीक्षानगर मधील काही तरुण पुढे सरसावले असता तलवारधारी इसमाने तेथून पळ काढला. दरम्यान, कारमधील दुसरा व्यक्ती कोयता घेऊन बाहेर आला आणि त्याने बिळासकर यांच्यावर हल्ला करणार तेवढ्यात बिळासकर यांनी त्याचावर झडप टाकली.

बिळासकर यांचा सत्कार करुन दिले पारितोषिक

काही वेळातच वडाळा टिटी पोलीस ठाण्याचे एक पथक बिळासकर यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी या शस्त्रधारी इसमाला कारसह पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याचे नाव फिरोज मलिक शेख (३२) असे असून तो प्रतीक्षा नगरमध्येच राहणारा आहे. तो आणि त्याच्या साथीदाराने भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कार चोरी करून एका दुकानात दरोडा घालण्यासाठी निघाले होते अशी माहिती चौकशीतून समोर आली. राजकीरण बिळासकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून केलेल्या केलेल्या कामगिरीची दखल मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी घेऊन बिळासकर यांचा मंगळवारी सत्कार करून २० हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले.

First Published on: February 6, 2019 8:56 PM
Exit mobile version