बेनिफिट ऑफ डाउट, रंगबावरी, एका दशावतार एकांकिकांची बाजी

बेनिफिट ऑफ डाउट, रंगबावरी, एका दशावतार एकांकिकांची बाजी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचे अंतर कमी झाले आहे. दादरला व्यावसायिकचे शिवाजी मंदिर आणि प्रायोगिकचे छबिलदास नाट्यगृह केवळ एक गल्ली सोडून आहेत, पण तरीही रंगकर्मींना छबिलदासहून शिवाजी मंदिरपर्यंत पोहोचायला वेळ लागायचा. हल्ली मात्र पूर्वी केवळ प्रायोगिकवरच बघायला मिळू शकणारी नाटकं थेट व्यावसायिक रंगभूमीवर येत आहेत. याचा अर्थ आपले नाटक प्रगल्भ झाले आहे आणि आपला प्रेक्षक प्रगल्भ झाला आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी मंगळवारी व्यक्त केले.

शिवसेना नेते व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी रात्री गडकरी रंगायतन येथे पार पडला. त्याप्रसंगी डॉ. ओक बोलत होते. एक लाख रुपयाचे पारितोषिक असलेल्या या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ओक यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित होत्या. उदय सबनिस, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते, भारती पाटील यांची विशेष उपस्थिती होती. अंतिम फेरीचे प्रशिक्षक या नात्याने ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, नव्या पिढीचा दिग्दर्शक-अभिनेता अद्वैत दादरकर, विनायक दिवेकर, हर्षदा बोरकर आणि सुरेश मगरकर उपस्थित होते. याखेरीज पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते दिलीप बारटक्के, टॅगचे अध्यक्ष अशोक नारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वा. सावरकर प्रतिष्ठान, जनसेवा प्रतिष्ठान, ठाणे आर्ट गिल्ड आणि शिवसेना चित्रपट सेना यांच्या सहआयोजनातून पार पडलेल्या या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मिथक, मुंबई या संस्थेची ‘बेनिफिट ऑफ डाउट’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. याच एकांकिकेसाठी ओंकार राऊतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ‘रंगबावरी’साठी कांचन माळी हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. रंगबावरी (सेंट गोंसालो गार्सिया महाविद्यालय, वसई) आणि एका दशावतार (रुईया महाविद्यालय, मुंबई) या एकांकिकांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकावले. एका दशावतारसाठी प्राजक्त देशमुखने सर्वोत्कृष्ट लेखक आणि रणजीत पाटीलने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. आमचे आम्हीच, पुणे या संस्थेची ‘आय अ‍ॅग्री’ ही लक्षवेधी एकांकिका ठरली. शिवाय सर्वोकृष्ट प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा अशा सर्वच विभागांसाठी पुरस्कार देण्यात आले.

First Published on: January 24, 2019 4:04 AM
Exit mobile version