‘बेस्ट’मध्ये प्रवाशांची भरभराट पण खिशात खळखळाट!

‘बेस्ट’मध्ये प्रवाशांची भरभराट पण खिशात खळखळाट!

बेस्ट बसेस

मुंबईच्या रस्त्यांवर प्रवासी संख्या वाढल्याने भरभरून धावणाऱ्या बसेस एकीकडे दिसत असल्या तरीही त्यामधून बेस्टचे आर्थिक संकट कमी होण्यासाठी काहीही मदत यंदा झालेली नाही. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी २२४९ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प बेस्ट उपक्रमाकडून मांडण्यात आलेला आहे. बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे खरी पण त्याचे रूपांतर हे महसूल वाढीत झालेले नाही. याआधी १० ऑक्टोबरच्या बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी अर्थसंकल्पीय अंदाज बेस्ट समितीसमोर लिफाफ्यात सादर केला होता. मात्र विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे त्यावेळी अर्थसंकल्प उघडण्यात आला नव्हता. आज, मंगळवारी झालेल्या बेस्ट समिती सभेमध्ये हा लिफाफा उघडण्यात आला.

बेस्ट समितीला सादर करण्यात आलेल्या २०२०-२१ वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये उपक्रमाला २२.४९.७४ कोटी इतकी तूट झाल्याचे दाखवण्यात आले होते. तर या वर्षाच्या भांडवली खर्चासाठी ९१८.१९ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

परिवहन विभाग तोट्यातच

बेस्टच्या विद्युत आणि परिवहन या दोन विभागामध्ये यंदाच्या वर्षीही परिवहन विभाग तोट्यातच असल्याचे चित्र आहे. तर विद्युत पुरवठा विभाग मात्र नफ्यात आहे. विद्युत पुरवठा विभागाचा २०२०-२१ साठीचे उत्पन्न ४०६३ कोटी अपेक्षित आहे, तर खर्च हा ३९६३ कोटी रूपये इतका होईल, असे अपेक्षित आहे. शिलकीचे ९९.७३ कोटी रूपये बेस्टकडून विद्युत पुरवठा विभागाच्या भांडवली खर्चाकरिता वापरण्यात येणार आहेत. परिवहन विभागाचे उत्पन्न हे १४९५.९१ कोटी रूपये इतके अपेक्षित आहे. तर परिवहन विभागासाठी अपेक्षित असणारा खर्च हा दुपटीहूनही अधिक म्हणजे ३८४५.३८ कोटी रूपये इतका अपेक्षित आहे. त्यामुळे २३४९.४७ कोटी रूपये इतकी तूट परिवहन विभागाकडून दाखवण्यात आली आहे.

हेही वाचा –

मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला म्हणून भाजप-सेनेची बैठक रद्द – संजय राऊत

First Published on: October 29, 2019 8:44 PM
Exit mobile version