घाटकोपर-कळंबोली प्रवासासाठी दीड तास वेटिंग; बेस्टच्या लेट मार्कमुळे प्रवाशी त्रस्त

घाटकोपर-कळंबोली प्रवासासाठी दीड तास वेटिंग; बेस्टच्या लेट मार्कमुळे प्रवाशी त्रस्त

घाटकोपर-कळंबोली मार्गावर प्रवाशांचा खोळंबा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून मुंबई आणि उपनगरातील लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना फक्त बेस्टच्या बसेसवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र आज बेस्ट उपक्रमातील बसेस प्रवाशांना पुरेशी सेवा देण्यास अकार्यक्षम दिसून येत आहेत. घाटकोपर ते कळंबोली मार्गावरील सुरू असलेल्या बसेस (BEST Service Kalamboli Bus Stop To Ghatkopar) गेल्या काही दिवसांपासून एक ते दीड तासांच्या विलंबाने सुटत आहेत. त्यामुळे भरपावसात प्रवाशांना ताटकळत उभे राहून बसेसची प्रतीक्षा करावी लागत आहे. यासंबंधि तक्रार करुन सुध्दा बेस्टकडून दखल घेतली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे बेस्टच्या कारभारावर बेस्ट समितीच्या सदस्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. यादरम्यान बेस्टकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी बसेस सुरू होत्या. मात्र, राज्य सरकारने जेव्हा पुनश्च हरि ओमची घोषणा केली. तेव्हा सामान्य प्रवाशांसाठी बेस्टच्या बसेस सुरू झाल्या आहेत. बेस्टकडून सध्या दररोज ३ हजार २२४ बस चालवल्या जात असून दररोज ११ लाख ७२ हजार प्रवासी प्रवास करतात. लोकल सेवा सर्व सामान्यांसाठी बंद असल्याने मोठ्या प्रमाणात बेस्टची प्रवासी संख्या वाढली आहे. मात्र नियोजन अभावामुळे बेस्टच्या काही मार्गावर बसेस भरुन जात आहेत. तर काही मार्गावर बसेस रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे. बेस्टच्या घाटकोपर आगारातून सुटणार्‍या बसेसचे योग्य नियोजन नसल्यामुळे वाशी आणि कळंबोलीला जाणार्‍या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोर जावे लागत आहे.

घाटकोपर बस स्टेशनपासून कळंबोलीला जाणार्‍या बेस्ट बसेस १५-१५ मिनिटांनी धावत होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून मार्ग क्रमांक सी – ५३ वर (BEST Bus No. C 53) बसेस उशीराने धावत आहे. परिणामी सकाळी एक ते दीड तासाच्या अंतराने बसेस सुटत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. बसेसमध्ये गर्दी असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे तीन तेरा वाजत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. अनेक प्रवाशांनी या संबंधित बेस्टच्या घाटकोपर आगारातील अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. मात्र, यावर आतापर्यंत दखल घेतली गेली नाही.

बेस्ट उपक्रमांची मुख्य जबाबदारी प्रवाशांना सुविधा देण्याची आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही जबाबदारी योग्यरित्या बेस्ट प्रशासन पार पाडताना दिसून येत नाही. प्रवाशांच्या समस्या सांगून सुध्दा बेस्ट प्रशासन आमचे ऐकत नाही आहे. घाटकोपर-कळंबोली मार्गावरील बसेस योग्य वेळेवर सोडण्याची व बसेसची संख्या वाढविण्याची मागणी केली. मात्र, मागणीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. – सुनील गणाचार्य, वरिष्ठ सदस्य, बेस्ट समिती

 

First Published on: August 25, 2020 10:36 PM
Exit mobile version