बेस्टच्या तिकीट बॉक्ससाठी कंडक्टरांना भुर्दंड

बेस्टच्या तिकीट बॉक्ससाठी कंडक्टरांना भुर्दंड

बेस्टमध्ये ३३३७ बसचा ताफा आहे. बसचे एकूण ५०२ मार्ग असून, या मार्गावर आतापर्यंत ९६०८ ट्रायमॅक्स मशीन वापरल्या जायच्या. मात्र मागील काही दिवसांपासून ९० टक्के ट्रायमॅक्स मशीनच्या माध्यमातून बेस्टची लूट होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. बेस्ट प्रवाशांची मोठी रक्कम ट्रॉयमॅक्सकडे जात असल्याची बाब बेस्ट समितीच्या बैठकीत मांडण्यात आली होती. यामुळे ट्रायमॅक्स मशीनद्वारे तिकीट देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. आता पूर्वीप्रमाणेच कागदी तिकीट देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र यासाठी आवश्यक असलेले तिकीट बॉक्स बेस्टकडून देण्यात आलेले नाहीत.

तिकीट बॉक्स नसल्याने तिकिटांचे गठ्ठे वाहकांना पैशांच्या पॉकेटमध्ये ठेवावे लागतात. तिकीट काढता काढता पॉकिटातल पैसे पडतात. बॉक्स नसल्याने गमचा वापर करता येत नाही, त्यामुळे थुंकी लावून त्यांना तिकिटे फाडावी लागतात.
यापूर्वी कागदी तिकिटांसाठी देण्यात आलेले बॉक्स ट्रायमॅक्स मशीनच्या वितरणानंतर भंगारात काढण्यात आले. हे बॉक्स पुन्हा मिळवून देण्याची मागणी वाहकांकडून करण्यात आली आहे. मात्र बेस्टकडून या मागणीला फारशी दाद देण्यात आली नाही. बॉक्सअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन वाहकांनी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून बॉक्स खरेदी निर्णय घेतला आहे. बॉक्स विकत घेऊन वाहकांना भूर्दंड सोसावा लागत असला तरी तोच एक मार्ग असल्याचे वाहक सांगत आहेत.

फक्त १६ रुपयांपर्यंत तिकीट…
भोईसर, गौराई, दहिसर या मार्गावर धावणार्‍या बसेस लांब पल्ल्याच्या आहेत. तिथल्या तिकिटांची किंमत ३० ते ३५ रुपये इतकी आहे. तर मुंबईतील तिकीटचा दर सरासरी १६ रुपयांपर्यंत असल्याने प्रवाशांना एकाचवेळी तीन तिकिटे द्यावी लागतात. अशावेळी एखादे तिकीट गहाळ झाल्यास वाहकावरच कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळेच स्वखर्चाने हे बॉक्स खेरेदी करण्याचे वाहकांनी ठरवले आहे.

ट्रायमॅक्समुळे बेस्टचे १२२ कोटींचे नुकसान
बेस्टने २०१० मध्ये आपली कागदी तिकीटे बंद करत मशीनद्वारे तिकीट वितरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ट्रायमॅक्स कंपनीला याचे कंत्राट दिले होते. यासाठी ९ हजार मशीनचा वापर करण्यात येत होता. हळूहळू या यंत्रणेतील दोष समोर येऊ लागले. मशीन मध्येच बंद पडू लागली. अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे ट्रायमॅक्स मशिन वाहक आणि एकूणच बेस्टसाठी डोकेदुखी ठरू लागली. याचा फटका बेस्टला बसला. बेस्टकडील ९ हजारपैकी ६ हजार मशीन बंद पडल्याने बेस्टचे १२२ कोटींचे नुकसान झाले आहे.

बेस्ट वाहकांना तिकीट वितरणासाठी चांगली सुविधा उपलब्ध करून देणे ही बेस्टची जबाबदारी आहे. पैसे हरवू नयेत अथवा तिकीट गहाळ होऊ नये ही जोखीम वाहकांना घ्यावी लागते. त्याचबरोबरच प्रवाशांना हाताळण्याची कसरत करावी लागते. यात तिकीट बॉक्स नसल्याने अडचणी वाढतात.
– सुनिल गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य

आम्ही बेस्ट प्रशासनाकडे तिकीट बॉक्स देण्याची मागणी केली होती. मात्र कंडक्टरना कॅशबॅग मध्येच तिकीट ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे कंडक्टरना तिकीट वितरित करताना अडचण येते. आता कंडक्टर स्वतःच्या पैशाने तिकीट बॉक्स विकत घेत आहेत.
– जगनारायण कहार, सरचिटणीस, बेस्ट कामगार संघटना.

First Published on: August 29, 2018 4:30 AM
Exit mobile version